कमकुवत संघाला सहजगत्या हरवण्याचे स्वप्न घेऊन मैदानात उतरलेला रणजी स्पध्रेतील बलाढय़ मुंबई संघाला घरच्या मैदानावर फक्त एका गुणावर समाधान मानण्याची मानहानी सहन करावी लागली. तळाच्या झारखंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे दूरच राहिले, पण मुंबईला पराभव टाळण्यासाठी अखेरच्या दिवशी झगडावे लागले. बोथट, दिशाहीन गोलंदाजी आणि सवंग फलंदाजीमुळे ४० विजेतेपद जिंकलेल्या मुंबईच्या बेसूर खेळाचा फायदा झारखंडने उचलला. दुसऱ्या डावात इशांक जग्गीच्या शतकाच्या जोरावर झारखंडने मुंबईपुढे ३६५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण मुंबईचे पाच फलंदाज ७८ धावांत तंबूत परतल्यानंतर हिकेन शाह आणि सूर्यकुमार यादव यांनी नांगरधारी खेळ करत सामना अनिर्णीत राखला. त्यामुळे ‘खडूस’ मुंबईसाठी हा निकाल पराभवाचे शल्य देणारा नक्कीच असेल. या सामन्यानंतरही मुंबईने २० गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या सामन्याद्वारे झारखंडने तीन गुण कमावले आहेत.
इशांकने १४ चौकारांसह नाबाद १०३ धावा केल्या आणि त्यानंतर झारखंडने ७ बाद २७८ धावांवर दुसरा डाव उपाहाराच्या ४१ मिनिटांपूर्वी घोषित केला. या आव्हानाचा पाठलाग करणे मुंबईला जमलेच नाही. एकामागून एक फलंदाजांनी तंबूत परतण्याची घाई दाखवल्यामुळे मुंबई सामना गमावण्याचे चित्र निर्माण झाले होते. पण हिकेन शाहने ११८ चेंडूंत नाबाद २१ धावांची कूर्मगती खेळी साकारत संघाचा पराभव टाळला आणि आठ अतिरिक्त षटकांनंतर दोन्ही संघांनी सामना अनिर्णीत राखण्याचा निर्णय घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात संघाने अपेक्षेनुरूप कामगिरी केली. मुंबईला त्यांच्याच मैदानात पिछाडीवर ढकलल्याने संघाचा आत्मविश्वास दुणावला असून, याचा फायदा आम्हाला आगामी सामन्यांमध्ये होईल! शाहबाझ नदीम, झारखंडचा कर्णधार

हा सामना आमच्यासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या अनुपस्थितीने संघावर नक्कीच फरक पडला आहे. पण एका रात्रीमध्ये महान खेळाडू तयार होऊ शकत नाहीत, त्यांना थोडा वेळ द्यायला हवा!                                       – आदित्य तरे, मुंबईचा उपकर्णधार

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy mumbai eke out a draw against jharkhand