अंबाती रायुडूने शनिवारी हैदराबाद क्रिकेट संघटनेतील सदस्यांवर भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कडाडून टीका केली आहे. याचप्रमाणे राज्यमंत्री केटी रामा राव यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहनही रायुडूने केले आहे.
‘‘हैदराबाद क्रिकेट संघटनेतील काही सदस्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अनेक खटले प्रलंबित आहेत. त्याशिवाय स्थानिक स्पर्धामध्येही हैदराबाद संघाची कामगिरी ढासळत आहे. संघटनेमध्ये अनेक भ्रष्टाचारी सदस्यांचा समावेश असल्यामुळेच असे घडत आहे. त्यामुळे आदरणीय केटी, तुम्ही या प्रकरणात लक्ष द्या,’’ असे ३४ वर्षीय रायुडूने ‘ट्वीट’ केले.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघात निवड झाल्यानंतर रायुडूने वादग्रस्त ‘ट्विट’ पोस्ट करीत लक्ष वेधले होते. परंतु नंतर त्याने विश्वचषक चालू असतानाच निवृत्ती पत्करली. मग ऑगस्ट महिन्यात त्याने पुनरागमन करीत विजय हजारे करंडक आणि सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत हैदराबादचे नेतृत्व केले.
रायुडू निराश क्रिकेटपटू -अझरुद्दीन
अंबाती रायुडू हा निराश झालेला क्रिकेटपटू आहे, अशी प्रतिक्रिया हैदराबाद क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीनने व्यक्त केली आहे.