IND vs ENG 1st Test Day 1 Highlights: भारत वि. इंग्लंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला २० जूनपासून सुरूवात झाली आहे. भारताने पहिल्याच दिवशी उत्कृष्ट फलंदाजी करत ३ बाद ३५९ धावांचा टप्पा गाठला. यादरम्यान यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी शतकं झळकावली. तर उपकर्णधार ऋषभ पंतने अर्धशतकी खेळी केलीय. दरम्यान स्टोक्स आणि पंत यांच्यात बाचाबाची झालेली पाहायला मिळाली, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंत आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांच्यात एक वेगळीच स्पर्धा पाहायला मिळाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताने तिसरी विकेट गमावल्यानंतर ऋषभ पंत फलंदाजीला आला आणि त्याच्या बेधडक अंदाजात त्याने फटकेबाजी केली. ऋषभ पंतची ‘ऋषभपंती’ पाहून स्टोक्स त्याला शब्दही सुनावले.
बेन स्टोक्सने यशस्वी जैस्वालला क्लीन बोल्ड करत संघाला तिसरी विकेट मिळवून दिली. त्यानंतर मैदानात फलंदाजीला ऋषभ पंत आला. तो येताच त्याने बेन स्टोक्सच्या चेंडूवर स्टेप आऊट करत चौकार मारला. यानंतर हसत हसतच स्टोक्स पंतजवळ आला आणि काहीतरी बोलला आणि हसायला लागला. पण पंतने स्टोक्सच्या बोलण्याला कोणतंही उत्तर दिलंं नाही. पंतचा दणदणीत फटका पाहून स्टोक्सही चकित झाला होता.
स्टोक्सने त्याच्या पुढच्या षटकात स्लो यॉर्कर टाकत पंतला चकवण्याचा प्रयत्न केला. स्टोक्सचा हा प्लॅन सफल ठरलाच होता. पंतने एलबीडब्ल्यू बाद होऊ नये म्हणून वेळेत बॅट खाली आणली आणि वाचला. यावेळी, पंतने त्याच्याकडे पाहून हसत स्टोक्सशी काहीतरी बोलला. पण त्या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे कळलेलं नाही.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांची शाळा घेतली आणि चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, पंत १०२ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६५ धावांवर फलंदाजी करत आहे. तर गिल १२७ धावा करत नाबाद आहे. कर्णधार-उपकर्णधाराची जोडी भारताच्या दुसऱ्या दिवसाला सुरूवात करेल.