IND vs SA Rishabh Pant Catch on Jasprit Bumrah Bowling: ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेने सुरूवात चांगली केली पण बुमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे दोन्ही फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. यादरम्यान बुमराहच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने डाईव्ह मारत उत्कृष्ट झेल टिपला.

ऋषभ पंत इंग्लंड कसोटी दौऱ्यादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर आता पुन्हा मैदानावर उतरला आहे. इंग्लंड दौऱ्यावर ऋषभ पंतच्या पायाच्या बोटाला चेंडू लागल्याने फ्रॅक्चर झालं होतं. यानंतर तो संघाबाहेर होता आणि वेस्ट इंडिज मालिकेलाही मुकला होता. यानंतर आता दक्षिण आफ्रिका अ संघाविरूद्ध सामना खेळल्यानंतर कसोटी सामन्यासाठी संघात परतला.

ऋषभ पंतने हवेत डाईव्ह मारत घेतला चकित करणारा झेल

रिकल्टन आणि मारक्रम यांनी ५० धावांची भागीदारी करत चांगली सुरूवात केली. पण बुमराहने मात्र या दोघांनाही झटपट माघारी धाडलं. आधी बुमराहने ११व्या षटकात कमालीच्या चेंडूवर रिकल्टनला क्लीन बोल्ड करत माधारी धाडलं. यानंतर स्पेलमधील पुढील षटक टाकण्यासाठी बुमराह पुन्हा आला.

१३व्या षटकातील पहिलाच चेंडू बुमराहने शॉर्ट ऑफ लेंग्थ टाकला आणि एक्स्ट्रा बाऊन्स मिळाला. मारक्रम हा बाऊन्स पाहून थोडा मागे झाला आणि बॅकफूटवर जात त्याने बॅट पुढे केली. पण बॅटचा बाऊन्समुळे बॅटचा वरील भाग चेंडूला लागल्याने चेंडू मागच्या दिशेने स्लिपमध्ये गेला आणि पंतने उजव्या बाजूला डाईव्ह मारत शानदार झेल घेतला. पंतच्या या झेलमुळे संघाला दुसरी मोठी विकेट मिळाली.

यासह बुमराहने दोन षटकांत आफ्रिकेच्या दोन्ही सेट झालेल्या सलामीवीरांना माघारी धाडलं. यासह आफ्रिकेने १५ षटकांत २ विकेट्स गमावत ६९ धावा केल्या. तर मारक्रम ४८ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ३१ धावा करत बाद झाला.