टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत फुटबॉलचाही मोठा चाहता आहे. काल (मंगळवार) तो आपल्या मित्रांसह युरो चषक २०२० मधील सर्वात मोठा इंग्लंड आणि जर्मनीचा सामना पाहण्यासाठी वेम्बली स्टेडियमवर गेला होता. पंतने आपल्या मित्रांसह स्टेडियममध्ये सेल्फीही घेतले होते, जे त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताना पंतने कॅप्शनमध्ये लिहिले की, “फुटबॉल पाहणे हा एक चांगला अनुभव होता” तसेट पंतच्या मित्रांनी इंग्लंडची जर्सी परिधान केली होती. त्यांमुळे ते इंग्लंडला पाठिंबा देण्यासाठी गेले असल्याचे स्पष्ट होते. प्रत्येकाने इंग्लंडच्या फुटबॉल संघाची जर्सी परिधान केली आहे. विशेष म्हणजे इंग्लंडने या सामन्यात त्यांच्या जुन्या प्रतिस्पर्धी जर्मनीला २-० ने पराभूत करून युरो चषक २०२० च्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी पंत आणि भारतीय कसोटी संघातील अन्य खेळाडू इंग्लंडमध्येच सुटी घालवत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला सुमारे दोन आठवडे विश्रांती मिळाली आहे. या काळात खेळाडू केवळ लंडनमध्ये राहूनच आराम करू शकतात. करोनाच्या प्रोटोकॉलनुसार त्यांना लंडनबाहेर जाण्याची परवाणगी नाही.
