ऑस्ट्रलियन संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १९७ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर चौथ्या दिवशीदेखील स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन जोडीने दमदार खेळ केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पण दुर्दैवाने दोघांनाही आपलं शतक पूर्ण करता आलं नाही. लाबूशेन ७३ धावांवर झेलबाद झाला, तर स्मिथ ८१ धावांवर पायचीत झाला. सामन्यात कालच्या दिवसात ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याच्या जागी वृद्धिमान साहाला संघात यष्टीरक्षणासाठी घेण्यात आले. पंत मैदानावर नसूनही त्याला नेटीझन्सने ट्रोल केल्याचा प्रकार घडला.

नवदीप सैनी गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीवर लेग साईडला जाणाऱ्या चेंडूला लाबूशेनने टोलवण्याचा प्रयत्न केला. चेंडू लाबूशेनच्या ग्लोव्ह्ज ला लागला आणि चेंडूचा मार्ग थोडा बदलला गेला. तेव्हा वृद्धिमान साहाने सुपरमॅनसारखी उडी घेत चेंडू झेलला आणि लाबूशेनला माघारी धाडलं.

लाबूशेनने ११८ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. ९ चौकारांचा समावेश होता. वृद्धिमान साहाने टिपलेल्या अप्रतिम झेलाला नेटीझन्सने सलाम तर केलाच, पण त्याचसोबत ऋषभ पंतलादेखील ट्रोल करण्यात आले.

दरम्यान, लाबूशेननंतर काही वेळातच स्टीव्ह स्मिथदेखील बाद झाला. त्याने १६७ चेंडूत ८१ धावा केल्या. स्मिथच्या खेळीत ८ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. अश्विनच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला.