अंतिम लढतीसाठीच्या खेळपट्टीवर दोन्ही संघांची नाराजी
हॅरिस शिल्ड ही मुंबई क्रिकेटमधील मानाची स्पर्धा. देशवासीयांना अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या असंख्य क्रिकेटपटूंनी याच स्पर्धेद्वारे आपल्या कौशल्याची चुणूक पहिल्यांदा दाखवली. यंदा रिझवी स्प्रिंगफिल्डने जेतेपदावर नाव कोरले. मात्र अंतिम लढतीला साजेशी खेळपट्टी नसल्याने दोन्ही संघांनी नाराजी प्रकट केली आहे. चेंडूला असमान उसळी मिळणारी आणि पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीमुळे संपूर्ण लढतीत केवळ दोनच फलंदाजांना अर्धशतकाची वेस गाठता आली. चांगल्या दर्जाच्या खेळपट्टीवर हा सामना झाला असता तर सामन्याचे चित्र वेगळे दिसले असते, अशी प्रतिक्रिया दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केली.
‘‘सलामीच्या दिवशीच खेळपट्टी खराब होत जाईल याची कल्पना आली. म्हणूनच आम्ही वेगवान गोलंदाजांना संघात सामील केले नाही. श्रेयश बोगर हा मूलत: वेगवान गोलंदाज आहे. मात्र त्याने बहुतांशी बळी डावखुरा फिरकीपटू म्हणून कमावले. अंतिम लढत सुरू असताना बॉम्बे जिमखाना येथील खेळपट्टी उपलब्ध असल्याचे स्पष्ट होत होते. कर्नाटक स्पोर्टिग येथेही हा सामना खेळवता आला असता. आमच्या संघात मुंबईचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आहेत. त्यांनाही या खेळपट्टीवर स्थिरावून मोठी खेळी करता आली नाही. चारही डावांमध्ये मिळून केवळ दोन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. आम्हाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आमच्या खेळात चुका झाल्या. मात्र खेळपट्टी चांगली असती तर आम्ही रिझवी संघाला दमदार प्रत्युत्तर दिले असते,’’ असे मत अल बरकत संघाचे प्रशिक्षक नफीस खान यांनी व्यक्त केले.
‘‘स्थानिक क्रिकेटमधील ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. मुंबईतील बहुसंख्य मैदाने सामन्यासाठी उपलब्ध होती. मात्र साधारण दर्जाची खेळपट्टी असलेल्या मैदानात सामना खेळवण्यात आला. किमान उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना तरी चांगली खेळपट्टी असलेल्या मैदानावर झाला असता तर दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळाले असते. तीन दिवसांत ४० फलंदाज बाद झाले. दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांनी जेमतेम पाच षटके टाकली. यावरून फिरकीचे प्रभुत्व लक्षात येते. अंतिम लढतीत अर्धशतक झळकावणे कठीण व्हावे, यावरून खेळपट्टीची कल्पना यावी. रिझवी संघाने चिवटपणे खेळ करीत जेतेपद पटकावले, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र त्याने खेळपट्टीचे सत्य नाकारता येणार नाही,’’ असे रिझवीचे प्रशिक्षक राजू पाठक यांनी सांगितले.