Rohit Sharma Son & Daughter Celebrate Raksha Bandhan: आज सगळीकडेच रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. यादरम्यान क्रिकेटपटूदेखील आपल्या बहिण आणि भावांना राखी बांधत त्यांचे गोड फोटो शेअर करताना दिसत आहेत. यादरम्यान रोहित शर्माची मुलगी समायरा आणि मुलगा अहान यांनी पहिल्यांदा रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. त्याचा फोटो रितिकाने शेअर केला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्माने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर रोहित संपूर्ण कुटुंबासह सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी युरोप दौऱ्यावर गेला होता. रोहितने या सुट्ट्यांचे अनेक फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रोहित रक्षाबंधनापूर्वीच कुटुंबासह भारतात परतला.

रितिकाने शेअर केले अहान-समायराच्या रक्षाबंधनाचे फोटो

रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने समायरा आणि अहानच्या हातांचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये चिमुकल्या अहानच्या हातावर तिने बांधलेली राखी आहे. तर समायराने त्याचा राखी बांधलेला हात आपल्या हातात पकडला आहे. या फोटोवर रितिकाने राखीच्या शुभेच्छा असा स्टिकरही वापरला आहे.

रोहित आणि रितिका १५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुसऱ्या मुलाचे आई-बाबा झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली. त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव अहान असं ठेवलं आहे. तर समायराचा जन्म २०१८ मधील आहे.

रोहित शर्माच्या लेकाने आणि लेकीने पहिल्यांदा साजरं केलं रक्षाबंधन (फोटो-@Ritikasajdeah)

आयपीएल २०२५ नंतर रोहित शर्मा कुटुंबासह दुबई, इटली, लंडनमध्ये फिरताना दिसला. यानंतर त्याने इंग्लंडमध्ये त्याच्या कुटुंबासोबत सुट्ट्याही घालवल्या. लंडनमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना पाहण्यासाठी पोहोचला होता.