भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा कायमच हाय व्होल्टेज असतो. असाच सामना २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत झाला. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानला चांगलेच झोडपले आणि त्यांच्यावर आतापर्यंतचा विश्वचषकातील सर्वात मोठा विजय मिळवला. पण ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. हा पराभवाची सल भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात अजूनही आहे. त्यातच भारताचा हिटमॅन रोहित शर्मा याने याबाबतच्या कटू आठवणी चुकून ताज्या केल्या.

रोहित शर्माने एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोत त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाचा फोटो पोस्ट केला होता. भारताने २०१३ साली इंग्लंडला पराभूत करून ही स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी काढलेला हा फोटो होता. मात्र या फोटोमध्ये कॅप्शन देताना रोहित शर्माने थोडीशी गफलत केली. रोहितने या फोटोच्या कॅप्शनमध्ये चुकून चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ असे लिहीले.

या कॅप्शनसह फोटो ट्विटरवर आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर रोहित प्रचंड ट्रोल झाला. रोहितने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सुरेश रैना, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांचा समावेश आहे. त्यामुळे या फोटोच्या कॅप्शनमधील चूक स्वतः सुरेश रैनानेही रोहितच्या लक्षात आणून दिली.

रोहितने लगेचच फोटो डिलीट केला. आणि पुन्हा एकदा योग्य कॅप्शन सह तो फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.

पण हा प्रकार लक्षात येऊन तो फोटो नव्याने अपलोड करेपर्यंत सोशल मीडियावर या चुकीची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अनेकांनी रोहित शर्माची टिंगल केली. या प्रकारामुळे रोहित चांगलाच ट्रोल झाला.

दरम्यान, भारतीय संघ २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. त्यात रोहित शर्माने या स्पर्धेत २ शतके ठोकून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.