Former Indian Cricketer on Rohit Sharma Virat Kohli Test Retirement: भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांनाच धक्का दिला. इंग्लंड दौऱ्यापूर्वी, या दोन्ही खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या कसोटी कारकिर्दीला निरोप दिला होता, त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या दोन्ही खेळाडूंनी निवृत्ती स्वेच्छेने नव्हे तर बीसीसीआय आणि निवडकर्त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे घेतल्याचा खळबळजनक दावा माजी खेळाडूने केला आहे.

भारताचे माजी खेळाडू करसन घावरी यांनी युट्यूब शो ला दिलेल्या एका मुलाखतीत भारतीय क्रिकेटवरील अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. रोहित शर्मा विराट कोहली यांची निवृत्ती तर भारत-इंग्लंड दौऱ्यापूर्वी या मालिकेचं नाव पतौडी ट्रॉफी बदलून अंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी ठेवण्यात आलं. याबाबत त्यांनी बीसीसीआय आणि सचिन तेंडुलकर यांना सुनावलं आहे.

करसन घावरी यांच्या मते, विराट कोहली कमीत कमी एक-दोन वर्ष तर कसोटी क्रिकेट खेळू शकला असता. रोहित आणि विराटला कसोटी निवृत्तीनंतर फेयरवेल न देण्याबाबत त्यांनी बीसीसीआयबाबत त्यांनी वक्तव्य केलं आहे. करसन घावरी म्हणाले, “कोहली निश्चितच भारतासाठी कदाचित पुढची काही वर्ष खेळू शकला असता. पण मला वाटतं की त्याला निवृत्ती घेण्यास भाग पाडलं गेलं. जेव्हा तो निवृत्त झाला तेव्हा बीसीसीआयने त्याला फेयरवेलदेखील दिलं नाही. या अशा उत्कृष्ट खेळाडूंना भारतीय क्रिकेटने फेयरवेल देणं गरजेचं होतं.”

‘रोहित शर्माने वेळेआधीच निवृत्ती घेतली’, माजी भारतीय क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

करसन घावरी यांनी असा दावाही केला की रोहित आणि कोहली हे भारतीय संघ व्यवस्थापनाच्या अंतर्गत राजकारणाचे बळी ठरले आहेत. घावरी म्हणाले, “हे बीसीसीआयचं अंतर्गत राजकारण आहे जे समजून घेणं कठीण आहे आणि मला वाटतं की कदाचित हीच कारणे आहेत ज्यामुळे त्यांनी वेळेआधीच निवृत्ती घेतली.”

रोहित शर्माबद्दल घावरी म्हणाले, “रोहित शर्मानेही वेळेआधीच निवृत्ती घेतली. त्याला संघाबाहेर होण्यास सांगण्यात आले. असं नाहीये की त्याला जायचं होतं, त्याला संघामध्ये राहत खेळायची होती. पण निवडकर्त्यांचे आणि बीसीसीआयचे विचार वेगळे होते. हे सर्व एक प्रकारचं राजकारण आहे.”

टी२० विश्वचषका २०२४ नंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी२० क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. यानंतर २०२५ च्या सुरूवातीला दोघांनी कसोटी क्रिकेटला अलविदा केलं. आता हे दोन्ही खेळाडू फक्त एकदिवसीय सामने खेळताना दिसणार आहेत. टीम इंडिया या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, जिथे एकदिवसीय मालिका खेळली जाईल. परंतु काही वृत्तांनुसार, हा दौरा रोहित आणि विराटचा शेवटचा दौरा असू शकतो. पण या प्रकरणात कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही.