Rohit Sharma World Record in ICC Tournaments: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आणखी एका आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. आता दुसरे जेतेपद भारतापासून फक्त एक पाऊल दूर आहे. अंतिम फेरीत विजयाची नोंद करून, भारतीय क्रिकेट संघ आणखी एक ICC ट्रॉफी आपल्या नावे करणार आहे. दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा चार गडी राखून पराभव करत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. जे काम आजपर्यंत जगातील कोणताही कर्णधार करू शकला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्मा भारतीय संघाचा उत्कृष्ट कर्णधारांपैकी एक कर्णधार म्हणून समोर आला आहे. रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने अनेक उत्कृष्ट कामगिरी करत नवे विक्रम केले आहेत. आता रोहित शर्माने आयसीसी स्पर्धांमध्ये अशी कामगिरी केली आहे, जी आजवर कोणत्याच कर्णधाराला करता आलेली नाही.

आयसीसीच्या सर्व चार स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा रोहित शर्मा आता जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. २०२३ मध्ये, टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिथे त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. २०२३ मध्येच, भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ICC एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. यावेळीही भारताचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला हरवून हे विजेतेपद पटकावले होते.

यानंतर २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी झाला आणि तेथे भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून टी-२० विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. भारतीय संघ गेली अनेक वर्षे आयसीसी ट्रॉफीची वाट पाहत होता. संघाला त्याची उणीव भासत होती, पण रोहितने हा दुष्काळ संपवला आणि जेतेपदासह भारतात परतले.

यानंतर आता २०२५ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. टीम इंडिया बाजी मारणार की नाही, हे ९ मार्चला कळेल. पण फायनलमध्ये पोहोचताच रोहित शर्माने असे काही करून दाखवले जे केवळ भारताचाच नाही तर जगातील कोणताही कर्णधार करू शकला नाही. आता जर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील संघाने विजेतेपद पटकावले तर दुग्धशर्करा योग असेल.

रोहित शर्मा चारही आयसीसी स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठणारा पहिला कर्णधार

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (२०२३)
ICC एकदिवसीय विश्वचषक (२०२३)
T20 विश्वचषक (२०२४)
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी (२०२५)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma world record becomes the first ever captain to reach the final in all four mens icc tournaments bdg