मराठमोळ्या सचिन कुंभारचा अनोखा प्रवास
‘‘प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामाची अंतिम लढत मुंबईतील एनएससीआय स्टेडियममध्ये रंगली होती. मी त्या वेळी प्रेक्षकांमध्ये होतो. निवेदक आणि त्यांचे उत्तम सादरीकरण पाहून आपल्यालाही या स्पर्धेचे निवेदन करण्याची संधी मिळावी असे वाटले. त्यानुसार प्रयत्न सुरू केले. खेळाची कोणतीही पाश्र्वभूमी नव्हती, पण सगळे शिकून घेतले आणि पुढच्याच हंगामात प्रो कबड्डीच्या निवेदकांच्या ताफ्यात माझेही नाव होते,’’ अशा शब्दांत प्रवाही संभाषण कौशल्यासह प्रो कबड्डी लीगचे सूत्रसंचालन करणाऱ्या मराठमोळ्या सचिन कुंभारने आपली कहाणी उलगडली.
‘‘मी पक्का मुंबईकर आहे. आयईएस किंग जॉर्ज शाळा आणि रुईया महाविद्यालय. अभ्यासाव्यतिरिक्त कलागुणांना वाव देणाऱ्या संस्थांमध्ये असूनही मी कधीही कशातही भाग घेतला नाही. चार लोकांसमोर बोलण्याचीही मला भीती वाटायची. आत्मविश्वास अजिबातच नव्हता. अनोळखी माणसाला बोलते करणे कल्पनेपलीकडचे होते. शालेय टप्प्यानंतर हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. बेकरी आणि कन्फेक्शनरी शिकून दुकान काढण्याचा विचार होता, पण तो विचार बारगळला,’’ असे सचिनने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘यादरम्यान तुझा आवाज चांगला आहे, असे अनेकांनी सांगितले. यातूनच दुबईला जाण्याची संधी मिळाली. २००४ मध्ये व्हॉइस कल्चरविषयी फारशी माहिती नव्हती. रेडिओ जॉकी होण्यासाठी प्रशिक्षण घेतले. क्षेत्राविषयी माहिती नसल्याने बाबांचा विरोध होता, पण आईचा पाठिंबा होता. दुबईला गेल्यावर भाषा, उच्चार, लहेजा, आत्मविश्वास यामध्येही किती मागास होतो, याची जाणीव झाली. एकेक करून गोष्टी शिकून घेतल्या. टीव्ही, रेडिओ कार्यक्रम, व्हॉइस ओव्हर, सूत्रसंचालन असे दुबईत आठ वर्षे काम केले. भारतात आल्यानंतर काम मिळवताना अडचणी आल्या. फेमिना मिस इंडियाचे सूत्रसंचालन करतो. लाइव्ह शोज करतो. कॉर्पोरेट कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही करतो आणि चॅनेल व्ही वाहिनीचा बीच फेस्टिव्हल कार्यक्रम करतो.’’
प्रो कबड्डीचा सूत्रसंचालक म्हणून संधीबाबत सचिन म्हणाला, ‘‘प्रत्येक भारतीय माणसाला जेवढी खेळांविषयी माहिती असते, तेवढे मला ठाऊक होते. मुंबईतल्या एका महोत्सवाचे चार वर्षे सूत्रसंचालन करतोय. ते काम पाहून समीर चतुर्वेदी या मित्राने शिफारस केली. नेमके त्याच वेळी मी प्रो कबड्डी लीगचा सूत्रसंचालक म्हणून संधी मिळावी, यासाठी प्रयत्न करत होतो. सगळ्या गोष्टी जुळून आल्या. रीतसर चाचणीनंतर सुरुवातीला हॉकी इंडिया लीगच्या सूत्रसंचालनाची संधी देण्यात आली. हॉकीचा आणि माझा काहीच संबंध नव्हता, पण वाहिनीच्या माणसांनी मला प्रत्येक गोष्ट शिकवली. या कामातून माघार घेण्याचा निर्णय जवळपास पक्का केला होता, पण स्टार स्पोर्ट्सच्या माणसांनी विश्वास दिला. हॉकी इंडिया स्पर्धेच्या अंतिम लढतीनंतर पुरस्कार वितरण सोहळ्याचेही सूत्रसंचालन केले.
तो पुढे म्हणाला, ‘‘कबड्डीच्या निमित्ताने सर्वस्वी नव्या क्षेत्रात पाय रोवले. मनोरंजनाच्या पल्याडही काम करू शकतो असा विश्वास मिळाला. प्रो कबड्डीच्या सूत्रसंचालनाचा प्रस्ताव समोर आला, तेव्हा खेळाची काहीच माहिती नव्हती. पुन्हा एकदा नकार देण्याच्या विचारात होतो. लोकांना ग्लॅमर दिसते, पण आम्ही सगळेच जण खेळाडू, त्यांचे आयुष्य, आकडेवारी, डावपेच याचा सविस्तर अभ्यास करतो. थेट प्रक्षेपण असल्याने संहिता ठरलेली नसते. प्रसंगावधान राखून बोलावे लागते. मराठी मुलांमध्ये न्यूनगंड असतो. तो माझ्यातही होता. समोरच्या माणसाला तुमची मातृभाषा काय आहे, हे कळू नये इतके प्रभुत्व असायला हवे. असंख्य जाणकार व्यक्तींचे यात योगदान आहे. तुमचे कामच बोलके असेल तर गटबाजी, राजकारण हे सगळे मागे पडते.’
