भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर लवकरच छोटय़ा पडद्यावर दिसणार आहे. ‘मास्टर ब्लास्टर्स’ या नावाच्या अ‍ॅनिमेशन मालिकेत सचिनचा सहभाग असणार आहे.
शेमारू एंटरटेनमेंटच्या प्रवक्त्याने सांगितले, ‘‘युवा नैपुण्यास चालना देण्यासाठी सचिनची निवड केली असून या मालिकेद्वारे तो युवा खेळाडूंनी कसा विकास करावा याबाबत मार्गदर्शनही करणार आहे.’’ या मालिकेत २२ मिनिटांचे २६ भाग असतील. एका आंतरराष्ट्रीय संस्थेने या मालिकेकरिता क्रिकेटच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सचिनवर सोपविली आहे.
या मालिकेबाबत सचिनने सांगितले, ‘‘अ‍ॅनिमेशन लघुपटांबाबत मला खूप आकर्षण आहे. मी माझ्या मुलांबरोबर अनेक वेळा अ‍ॅनिमेटेड चित्रपट पाहिले आहेत. त्या चित्रपटांद्वारे मुलांना खूप काही शिकायला मिळते. अशा मालिकांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे.’’