लिन डॅनसारख्या सार्वकालीन महान खेळाडूला नमवण्याचा पराक्रम करणाऱ्या किदम्बी श्रीकांतने हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली. ‘भारताची फुलराणी’ अर्थात सायना नेहवालला मात्र अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.
श्रीकांतने हाँगकाँगच्या वेई नानवर २१-१४, २१-१५ अशी मात केली. वेईने ५-४ अशी आघाडी घेतली होती. यानंतर श्रीकांतने टिच्चून खेळ करत १०-१० अशी बरोबरी साधली. यानंतर सातत्याने गुण पटकावत श्रीकांतने पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने दमदार स्मॅशेस, प्रभावी क्रॉसकोर्ट आणि नेटजवळून सुरेख खेळ करत वर्चस्व गाजवले. दुसऱ्या गेमसह श्रीकांतने उपांत्य फेरीत स्थान पटकावले.
महिलांमध्ये तैपेईच्या सहाव्या मानांकित तेई त्झ्यू यिंगने तिसऱ्या मानांकित सायनावर २१-१५, २१-१९ अशी सरळ गेम्समध्ये विजय मिळवला. या सामन्याआधी सायनाची यिंगविरुद्धची कामगिरी ५-२ अशी होती. या दोघींमधील शेवटची लढतही सायनानेच जिंकली होती. मात्र या लढतीत यिंगने सायनाला निष्प्रभ ठरवले.
पहिल्या गेममध्ये २-२ अशी बरोबरी होती. यानंतर यिंगने आक्रमक पवित्रा स्वीकारला आणि सातत्याने गुणांची कमाई केली. यिंगच्या सर्वसमावेशक खेळासमोर सायना निरुत्तर ठरली. सामन्यातले आव्हान जिवंत राखण्यासाठी सायनाला दुसरा गेम जिंकणे अनिवार्य होते. सायनाने सगळा अनुभव पणाला लावत यिंगला टक्कर दिली. मुकाबला १९-१९ बरोबरीत असताना यिंगने सलग दोन गुण पटकावत दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2014 रोजी प्रकाशित
कहीं खुशी, कहीं गम!
लिन डॅनसारख्या सार्वकालीन महान खेळाडूला नमवण्याचा पराक्रम करणाऱ्या किदम्बी श्रीकांतने हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली.
First published on: 22-11-2014 at 05:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal out of hong kong open super series