जेतेपदासह विजयपथावर परतण्यासाठी उत्सुक सायना नेहवालने चीन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. याचप्रमाणे पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत यांनी विजयी आगेकूच केली. एच.एस. प्रणॉयसह मनू अत्री-सुमीत रेड्डी जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले.
सहाव्या मानांकित सायनाने जपानच्या सायाका ताकाहाशीवर २१-१४, १९-२१, २१-१७ असा विजय मिळवला. या विजयासह सायनाने ताकाहाशीविरुद्ध निर्विवाद वर्चस्वाची परंपरा कायम राखली. या सामन्यात तिला चांगलाच संघर्ष करावा लागला. पहिल्या गेममध्ये सायनाने दमदार स्मॅशेसच्या बळावर आगेकूच केली. दुसऱ्या गेममध्ये ताकाहाशीने शैलीदार खेळ करत सायनाला तंगवले. मात्र मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत सायनाने बाजी मारली. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये सायनाने नेटजवळून सुरेख खेळ केला व कमीत कमी चुका करत सामन्यावर कब्जा केला.
पुरुषांमध्ये पी. कश्यपने हाँगकाँगच्या नॅन वेईवर २४-२२, १९-२१, २१-१५ असा विजय मिळवला. मॅरेथॉन अशा पहिल्या गेममध्ये कश्यपने सरशी साधली. दुसऱ्या गेममध्ये कश्यपला सातत्य राखता आले. तिसऱ्या गेममध्ये कश्यपने झंझावाती खेळ करत सामना जिंकला. तसेच के. श्रीकांतने आरएमव्ही गुरुसाईदत्तला २१-११, ९-२१, २१-१५ असे नमवले. तर डेन्मार्कच्या व्हिक्टर अक्सलसेनने एच. एस. प्रणॉयचा २१-१०, १९-२१, २१-१८ असा पराभव केला.
चीनच्या झिआलाँग लियू- झिहान क्वियू जोडीने मनू अत्री-सुमीत रेड्डी जोडीवर २१-१२, २१-१५ अशी मात केली. मिश्र दुहेरीत चीनच्या चेंग लियू-यिझिन बाओ जोडीने प्राजक्ता सावंत व मलेशियाच्या व्होन्टास इंद्रा मवान जोडीवर २१-१०, २१-११ असा विजय मिळवला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2014 रोजी प्रकाशित
सायनाची विजयी सलामी
जेतेपदासह विजयपथावर परतण्यासाठी उत्सुक सायना नेहवालने चीन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-11-2014 at 06:53 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal p kashyap win in china open