भारताच्या सानिया मिर्झा हिने झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅक हिच्या साथीत चीन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिलांच्या दुहेरीत अजिंक्यपद मिळविले. या मोसमातील तिचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे.
सानिया व कॅरा यांनी व्हेरा दुशेव्हिना (रशिया) व अरांता पॅरा (स्पेन) यांचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडविला. हा सामना त्यांनी एक तास सहा मिनिटांमध्ये जिंकला. त्यांना आठवे मानांकन देण्यात आले होते. सानिया व कॅरा यांनी टोकियो येथे नुकत्याच झालेल्या पॅन पॅसिफिक स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते.
सानिया हिने यंदा आतापर्यंत पाच स्पर्धामध्ये महिलांच्या दुहेरीचे विजेतेपद मिळविले आहे. तिने अमेरिकन खेळाडू बेथानी मॅटेक सँड्स हिच्या साथीत दुबई व ब्रिस्बेन येथील स्पर्धा जिंकल्या होत्या. त्यानंतर तिने चीनच्या जेई झेंग हिच्या साथीत न्यू हेवन स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते. कारकीर्दीतील तिचे हे १९ वे विजेतेपद आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza and cara black win china open title