खेळापेक्षा वादविवादांच्या केंद्रस्थानी राहणारी खेळाडू असा शिक्का बसलेल्या सानिया मिर्झाने रॅकेटच्या साह्य़ाने आपले कर्तृत्त्व सिद्ध करत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. देशात टेनिस संस्कृतीचा अभाव असताना सानियाने टेनिसचा ध्यास जोपासला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीव्र स्पर्धा आणि दुखापती यांचा सामना करत सानियाने अव्वल स्थानाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी सानिया पहिली महिला भारतीय टेनिसपटू ठरली आहे.
मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना सानियाने डब्ल्यूटीए फॅमिली सर्कल चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सानिया-हिंगिस जोडीने अंतिम लढतीत कॅसा डेलाअॅक्वा आणि दारिजा जुरॅक जोडीचा ६-०, ६-४ असा धुव्वा उडवला. या जेतेपदासह सानियाने ४७० क्रमवारी गुणांची कमाई केली. यामुळे तिचे एकूण क्रमवारी गुण ७९६५ झाले आणि तिच्या अव्वल स्थानी विराजमान होण्यावर शिक्कामोर्तब झाले. या संदर्भात औपचारिक घोषणा सोमवारी करण्यात येणार आहे. सानियाआधी लिएण्डर पेस आणि महेश भूपती यांनी पुरुष दुहेरीत अव्वल स्थान मिळवले होते. ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणारी सानिया पहिली भारतीय महिला टेनिसपटू आहे.
नव्या हंगामात सानियाने मार्टिना हिंगिस या अनुभवी खेळाडूसह खेळण्याचा निर्णय घेतला. सानिया-हिंगिस जोडीने एकत्र खेळताना १४ सामन्यांत निर्भेळ यश मिळवले आहे. इंडियन वेल्स, मियामीपाठोपाठ चार्ल्सटन स्पर्धा जिंकत सानिया-हिंगिस जोडीने जेतेपदाची हॅट्ट्रिक केली. जबरदस्त कामगिरीसह सानिया-हिंगिस जोडी वर्षअखेरीस होणाऱ्या फायनल्स स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
– सानिया मिर्झा
सानिया दृष्टिक्षेपात
ग्रँडस्लॅम जेतेपदे
ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा (मिश्र दुहेरी)-२००९
फ्रेंच खुली स्पर्धा (मिश्र दुहेरी)-२०१२
अमेरिकन खुली स्पर्धा (मिश्र दुहेरी)-२०१४
आशियाई क्रीडा स्पर्धा
बुसान २००२ मिश्र दुहेरी- कांस्यपदक
दोहा २००६ मिश्र दुहेरी- सुवर्णपदक
दोहा २००६ महिला एकेरी- रौप्यपदक
दोहा २००६ महिला सांघिक- रौप्यपदक
गुआंगझाऊ २०१०महिला एकेरी- कांस्यपदक
इन्चॉन २०१४ महिला दुहेरी-कांस्यपदक
इन्चॉन २०१४ मिश्र दुहेरी-सुवर्णपदक
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
दिल्ली २०१० महिला एकेरी- रौप्य
दिल्ली २०१० महिला दुहेरी- कांस्य