Pakistan Team Players Loading Truck: पाकिस्तान क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी शुक्रवारी ऑस्ट्रेलियात दाखल झाला, पहिला सामना पर्थमध्ये १४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान पाकिस्तानचे खेळाडू ऑस्ट्रेलियात आल्यानंतर त्यांचे सामान ट्रकमध्ये लोड करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे खेळाडू क्रूला त्यांच्या किट बॅग आणि बॅग लोड करण्यात मदत करताना दिसत होते. या व्हिडीओवरून चाहत्यांनी गैरव्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांना दोष दिला होता. मात्र पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनुका ओव्हल येथे पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानी संघाचा नवा कर्णधार शाहीन आफ्रिदीने सांगितले की, “आमची पुढची फ्लाइट पकडण्यासाठी आमच्याकडे फक्त ३० मिनिटे होती आणि सामान ट्र्कमध्ये लोड करण्यासाठी फक्त दोनच लोक होते म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांची मदत केली.”

पाकिस्तानी संघात महत्त्वपूर्ण बदल..

भारतात विश्वचषकातील दारुण पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे स्टार फलंदाज बाबर आझमने सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडले असून पीसीबीने विश्वचषक स्पर्धेतील संपूर्ण व्यवस्थापन संघालाही बदलले आहे. यापुढे सलामीवीर शान मसूद कसोटीसाठी संघाचे नेतृत्व करेल तर शाहीन आफ्रिदीला T20I संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. व्यवस्थापन संघाच्या बाबतही मोहम्मद हाफीजची क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर माजी वेगवान गोलंदाज वहाब रियाझ यांना निवड समितीचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे.

हे ही वाचा<< “मी विराट कोहली नाही पण माझा..”, अश्विनचं स्पष्ट उत्तर; म्हणाला, “मी जेवणाचाही त्याग केला, पण मला हाच टॅग..”

दुसरीकडे, मालिकेच्या आधी, आफ्रिदीने सांगितले की आमचा संघ डेव्हिड वॉर्नरची निरोपाची मालिका खराब करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जिओ न्यूजच्या हवाल्याने म्हणाला, “आम्ही त्याला शुभेच्छा देऊ, परंतु डेव्हिड वॉर्नरच्या शेवटच्या कसोटी मालिकेत आम्ही त्याच्यासाठी आमच्या विरुद्ध चांगल्या शेवटाची आशा करत नाही.”

१४ डिसेंबरपासून पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर तीन सामन्यांच्या बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दुसरी आणि तिसरी कसोटी अनुक्रमे मेलबर्न आणि सिडनी येथे खेळवली जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaheen afridi clears pakistan team players loading truck video gets high criticism before pak vs aus series promise hard time svs