बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनने बुधवारी मेरीलीबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) जागतिक क्रिकेट समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.सामनानिश्चितीच्या उद्देशाने सट्टेबाजांकडून अनेकदा संपर्क साधल्याची माहिती लपवल्यामुळे ३२ वर्षीय शाकिबवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. त्यामुळे शाकिब भारताविरुद्धच्या आगामी दौऱ्यालाही मुकणार आहे.
‘‘शाकिबने जागतिक क्रिकेट समितीशी सर्व प्रकारचे संबंध तोडले आहेत. शाकिबसारख्या खेळाडूला गमावल्यामुळे आम्हाला दु:ख झाले असून त्याने समितीसाठी दिलेले योगदान कायमस्वरूपी स्मरणात राहील. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर राखून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो,’’ असे ‘एमसीसी’ने निवेदनपत्रात नमूद केले आहे. २०१७ मध्ये शाकिबने जागतिक क्रिकेट समितीचे सदस्यत्व स्वीकारले होते. आजी-माजी क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या या समितीची वर्षभरातून दोनदा क्रिकेटचे नियम आणि अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठक होते. पुढील बैठक मार्च २०२० मध्ये श्रीलंकेत आयोजित करण्यात आली आहे.
शाकिब २०२३च्या विश्वचषकात नेतृत्व करेल – मोर्तझा
निलंबनाची शिक्षा भोगून शाकिब यशस्वीरीत्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, तसेच २०२३च्या विश्वचषकात तो बांगलादेशचे नेतृत्वसुद्धा करेल, असा आशावाद बांगलादेशचा एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार मश्रफी मोर्तझाने व्यक्त केला. ‘‘जवळपास गेल्या १३ वर्षांपासून माझा जवळचा मित्र असलेल्या शाकिबवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे मला अनेक रात्री जागूनच काढाव्या लागतील; परंतु मला शाकिबच्या क्षमतेवर विश्वास आहे. त्यामुळे तो यामधून सावरत २०२३च्या विश्वचषकात बांगलादेशचे नेतृत्व करेल,’’ असे मोर्तझा म्हणाला.
शाकिबच्या कारवाईविरुद्ध बांगलादेशमध्ये निषेध
ढाका : देशातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू शाकिबला निलंबनाची शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळे बुधवारी बांगलादेशचे लाखो चाहते या निर्णयाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. बांगलादेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजेपर्यंत जवळपास ७०० चाहते शाकिबच्या मगुरा येथील निवासस्थानी गर्दी करून होते. ‘शाकिबवरील निलंबन हटवा, बांगलादेश क्रिकेटच्या सुरक्षित भवितव्यासाठी त्याला एक संधी द्या’ अशा प्रकारचे संदेश लिहिलेले फलक हाती घेऊन चाहत्यांनी ‘आयसीसी’च्या निर्णयाचा विरोध केला, तर काहींनी बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या मुख्य कार्यालयासमोर गर्दी करून बंदी हटवण्यासाठी घोषणा दिल्या.
शाकिबसारख्या सुजाण व्यक्तिमत्त्वाच्या खेळाडूने अशी चूक करणे म्हणजे बांगलादेशचे दुर्दैव म्हणावे लागेल. शाकिब मानसिकदृष्टय़ा कणखर असला तरी त्याला पुनरागमन करणे नक्कीच सोपे नसेल. – हबिबूल बाशर,बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू
जवळपास गेल्या १३ वर्षांपासून माझा जवळचा मित्र असलेल्या शाकिबवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे मला अनेक रात्री जागूनच काढाव्या लागतील; परंतु मला शाकिबच्या क्षमतेवर विश्वास आहे. तो यामधून सावरत २०२३च्या विश्वचषकात बांगलादेशचे नेतृत्व करेल. – मश्रफी मोर्तझा, बांगलादेशचा कर्णधार
शाकिबला किंचितही सहानुभूती दाखवण्याची आवश्यकता नाही. शाकिबसारख्या अनुभवी खेळाडूने इतकी मोठी चूक करणे हे लज्जास्पद असून त्याच्यावरील बंदीचा काळ दोन वर्षांहून अधिक असावा. – मायकल वॉन, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू
