भारतीय संघाचा स्टार फलंदाज शिखर धवनने काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह त्याने आयपीएल स्पर्धाही खेळणार नसल्याचं सांगितलं होतं. क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या शिखर धवनने आता आपल्या वैयक्तिक आयुष्यात नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. शिखर धवनने आपल्या नव्या गर्लफ्रेंडचा फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक कार्यक्रमात किंवा सामन्यादरम्यान शिखर धवन या तरुणीसोबत दिसून आला आहे. या तरुणीचं नाव सोफी शाइन असं आहे. शिखर धवनने गुरुवारी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सोफीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने माय.. असं लिहून पुढे हार्टचा ईमोजी शेअर केला आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की, शिखर धवन आयर्लंडच्या तरुणीच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला आहे.

आयर्लंडच्या तरुणीच्या प्रेमात शिखर धवन क्लीन बोल्ड

शिखर धवनने क्रिकेटला रामराम केला आहे. मात्र, तो सामना पाहण्यासाठी मैदानावर हजेरी लावत असतो. एका सामन्यादरम्यान शिखर धवन आणि सोफी एकत्र दिसून आले होते. त्यावेळी दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता दोघांनीही पोस्ट शेअर करत गुड न्यूज दिली आहे.

कोण आहे सोफी शाइन?

आता सोफी शाइन कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. सोफी शाइनबद्दल बोलायचं झालं तर ती मुळची आयर्लंडची राहणारी आहे. दोघेही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करतात. तिचे सोशल मीडियावर ४४ हजार फॉलोअर्स आहेत. यापूर्वी दुबईत पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील, भारत – पाकिस्तान सामना पाहण्यासाठी देखील तिने मैदानात हजेरी लावली होती.

शिखर धवनची क्रिकेट कारकि‍र्द

शिखर धवनच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १६७ वनडे सामन्यांमध्ये ६७९३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १७ शतकं आणि ३९ अर्धशतकं झळकावली आहेत. तर कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ३४ सामन्यांमध्ये २३१५ धावा केल्या आहेत.

यादरम्यान त्याने ७ शतकं आणि ५ अर्धशतकं झळकावली आहेत. तर टी-२० क्रिकेटमधील ६८ सामन्यांमध्ये त्याने १७५९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ११ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत २२२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ६७६९ धावा केल्या आहेत.