पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा नेहमी आपल्या विवादास्पद विधानांमुळे चर्चेत असतो. पण यावेळी मात्र एका खळबळजनक गोष्टीमुळे तो चर्चेत आला आहे. २००५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मला संघातून फक्त अनफिट आहे म्हणून काढले नव्हते, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आणि पाकिस्तानी कर्णधाराने माझ्यावर बलात्काराचा खोटा आरोप लावून मला संघाबाहेर केले होते, असा गौप्यस्फोट शोएब अख्तर याने हॅलोशी बोलताना केला. पाक संघातील खेळाडूच्या एका चुकीमुळे हे खोटे आरोप माझ्यावर करण्यात आले आणि मला संघाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला, असेही अख्तरने यावेळी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“२००५ च्या ‘त्या’ ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आमच्या संघातील एक सहकारी आणि ऑस्ट्रेलियातील एक तरुणी यांच्यात काही तरी गैरसमज झाले होते. पण पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने त्या सहकाऱ्याचे नाव लपवून ठेवले. मी व्यवस्थापनाला विनंती केली की त्या खेळाडूचे नाव सांगू नका, पण किमान शोएबचा या प्रकरणाशी संबंध नाही हे तरी स्पष्ट करा. पण संघ व्यवस्थापन, क्रिकेट बोर्ड आणि तेव्हाचा कर्णधार कोणीही मला मदत केली नाही. त्यामुळे जेव्हा ते प्रकरण चर्चेत आलं, तेव्हा माझ्या नावाची चर्चा झाल्याचं दिसून आली”, असं शोएबने सांगितलं.

“पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि संघातील खेळाडू अनेकदा माझ्या मीडियातील लोकप्रियतेमुळे मला त्रास देण्याचा प्रयत्न करायचे, पण मला मिळालेली प्रसिद्धी आणि यश हे माझ्या मेहनतीचे फळ आहे. त्यामुळे मला त्रास देणारे निघून गेले पण मला आजही संपूर्ण क्रिकेटविश्वात ओळखले जाते. भारतासारख्या राजकीय शत्रुत्व असलेल्या ठिकाणीही मला कधी द्वेषाला सामोरे जावे लागले नाही. भारतात मला नेहमी प्रेम मिळाले आहे”, असेही अख्तरने मुलाखतीत नमूद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib akhtar blames pakistan team management and pcb for false allegations of rape and exclusion from team vjb