Asia Cup 2025 Shoaib Akhtar Message for Pakistan before IND vs PAK Final: आशिया चषकाच्या ४१ वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये प्रथमच अंतिम सामना खेळवला जात आहे. भारताने सुपर फोर टप्प्यातील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत अंतिम सामन्याचं तिकिट मिळवलं. तर पाकिस्तानने श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली. यानंतर आता अंतिम फेरीसाठी शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाला भारताचा पराभव करण्यासाठी खास मेसेज दिला आहे.

माजी पाकिस्तान वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट संघाला आवाहन केलं आहे की, भारताच्या संघाचा दबदबा पाहून घाबरू नका आणि आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात निर्धास्तपणे क्रिकेट खेळा. भारताने आतापर्यंत स्पर्धेत दोन वेळा पाकिस्तानला पराभूत केलं आहे. आता अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा भिडणार आहेत.

अख्तरने गेल्या काही आठवड्यांत पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर सातत्याने टीका केली होती. पण गुरुवारी बांगलादेशवर मात करून पाकिस्तान जेव्हा अंतिम फेरीत पोहोचला, तेव्हा अख्तरने संघाचं कौतुक केलं. त्याने म्हटलं की, पाकिस्तान संघात भारताला पराभूत करण्याची क्षमता आहे, भारताचा संघ आतापर्यंत अजिंक्य राहिला असला तरी पाकिस्तानचा संघ त्यांना हरवू शकतो.

पाकिस्तानने भले बांगलादेशवर विजय मिळवला असेल, पण त्यांच्या फलंदाजी विभागाने मात्र लाजिरवाणी कामगिरी केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना एक टप्प्यावर पाकिस्तानची अवस्था ५ बाद ४९ धावा अशी झाली होती. पण तरीही त्यांनी गोलंदाजीच्या बळावर सामन्यात पुनरागमन केलं. याच जिद्दीने भारताविरुद्धही लढा द्यावा, अशी मागणी शोएब अख्तरने केली.

शोएब अख्तर म्हणाला, “भारतीय संघाचा जो दबदबा आहे तो मोडायला हवा आणि जसा पाकिस्तान संघ बांगलादेशविरूद्ध खेळला त्याच निर्धाराने खेळायला हवं, त्याच विचारसरणीसह जिद्दीसह मैदानात उतरायला हवं. भारताला सामोरं जा! आणि लक्षात ठेवा, आपल्याला २० षटकं टाकायची आहेत असा विचार करू नका. आपल्याला त्यांना बाद करायचं आहे, या विचाराने उतरा. जेव्हा तुम्ही विकेट घेण्यासाठी जाता, तेव्हा भारतालाही कळेल की धावा करायला झगडावं लागेल, मोफत धावा मिळणार नाहीत,” असं अख्तरने पीटीव्ही स्पोर्ट्सवरील गेम ऑन है कार्यक्रमात सांगितलं.

पाकिस्तानला भारताला हरवायचं असेल तर ही एकच गोष्ट करावी लागणार

“‘भारत जगातील नंबर वन संघ आहे’ , हे विसरून पाकिस्तानने खेळायला हवं. आपल्याकडे जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी आणि हारिस रौफ आहेत, जे सध्याच्या काळात जगातल्या उत्कृष्ट गोलंदाजीपैकी एक आहेत. त्यामुळे हा विचार करत जर मैदानात उतरलात, तर काहीच अडचण नाही,” अख्तर पुढे म्हणाला.

“पाकिस्तानच्या बाजूने सामना फिरवायचा असेल तर पाकिस्तानला अभिषेक शर्माला सुरूवातीच्या षटकांमध्ये बाद करायला हवं, असं म्हटलं आहे. अख्तर म्हणाला, आपल्याला फक्त अभिषेक शर्माला बाद करायचं आहे. चांगल्या लेंथच्या चेंडूवर एखादा चौकार गेला तरी चालेल, एखाद्या जबरदस्त बाउन्सरवर किंवा भन्नाट चेंडूवर चौकार गेला तरी मान्य आहे. गोलंदाज म्हणून मी सांगतोय, रिकी पाँटिंगसारखा महान फलंदाजही जबरदस्त बाउन्सर किंवा अचूक लेंथच्या चेंडूला चुकू शकतो. मग अभिषेक काही चमत्कार करेल असं नाही. या स्पर्धेत त्याने चुकीच्या टायमिंगमुळे आणि फटक्यांमुळेही विकेट गमावली आहे.”

“अख्तर म्हणाला, “पहिल्या दोन षटकांतच अभिषेक बाद झाला, तर भारतही अडचणीत येईल. सध्या जी कमालीची सुरुवात मिळतेय त्यांना, आणि त्यानंतर ते जे निवांत असतात ते शक्य होणार नाही. अभिषेक लवकर बाद झाला, तर त्यांनाही झगडावं लागेल आणि दडपण त्यांच्यावर येईल.” असा कानमंत्र शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला भारताविरूद्ध अंतिम सामन्यापूर्वी दिला आहे.