Shreyas Iyer Gift to Net Bowler Video: भारतीय क्रिकेट संघ सध्या दुबईत न्यूझीलंडविरूद्ध अखेरच्या सामन्यासाठी सराव करत आहे. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीतील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता न्यूझीलंड आणि भारतातील हा सामना २ मार्च रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू या सामन्यासाठी जोरदार तयारी करताना दिसले. दुबईतील सराव सत्रादरम्यान टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या कृतीने सर्वांचे मन जिंकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रेयस अय्यरने आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये सराव सत्रादरम्यान नेट गोलंदाज जसकिरण सिंगला एक भेट दिली. श्रेयस अय्यरने त्याला शूज गिफ्ट म्हणून दिले, जसकिरणला गिफ्ट मिळताच त्याच्या चेहऱ्यावरील आनंदही द्विगुणित झाला. जसकिरणने चॅम्पियन्स ट्रॉफी सामने दुबईत खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशच्या फलंदाजांना नेट प्रॅक्टिस दरम्यान गोलंदाजी केली.

पण भारतीय संघाच्या सराव सत्रात गोलंदाजीसाठी त्याची निवड न झाल्याने तो निराश झाला. कारण भारतीय संघाच्या सरावासाठी आधीच अनेक ऑफस्पिनर्स होते. मात्र श्रेयस अय्यरने दिलेल्या या भेटवस्तूने जसकिरण सिंगची सर्व निराशा दूर केली.

नेट बॉलर जसकिरण सिंग हा व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि तो आवड म्हणून क्रिकेटही खेळतो. जसकिरणने मुलाखतीत हा सर्व प्रसंग सांगितला, जसकिरण लाँगऑफमध्ये फिल्डिंग करत होता तेव्हा अय्यर त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “पाजी कस काय,सगळं ठिक का.’ जसकिरण पीटीआयला सांगताना म्हणाला, ‘श्रेयस माझ्याकडे आला आणि विचारलं की तुझ्या चप्पलची साईज काय आहे? मी म्हणालो १० आणि तो म्हणाला मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे आणि त्याने मला त्याचे शूज दिले. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.”

जसकिरण पुढे म्हणाला, “मी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीच्या नेट बॉलिंग टीमचा भाग आहे. श्रेयस अय्यरने मला हे शूज दिले, जो माझ्या आयुष्यातील एक खास क्षण होता. मी या स्पर्धेत भारतासाठी क्षेत्ररक्षण केले पण गोलंदाजीची संधी मिळण्याची वाट पाहत होतो. मी पाकिस्तान आणि बांगलादेश संघाला नेटमध्ये गोलंदाजी केली हा खूप चांगला अनुभव होता”

जसकिरण पुढे म्हणाला, भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू हा खूप स्पेशल आहे.पण या सगळ्यांमध्ये माझा सर्वात आवडता खेळाडू ऋषभ पंत आहे. मला त्याला गोलंदाजी करायला आवडेल. आम्ही भारतीय संघाबरोबर पहिल्या ट्रेनिंग सेशनपासून आहोत आणि आज चौथा दिवस आहे. श्रेयस भाई मैदानात खूप उत्साही असतो आणि जेव्हा जेव्हा माझ्याइथे चेंडू यायचा तेव्हा तो कॅच पकड कॅच पकड म्हणायचा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas iyer gifts net bowler pair of new shoes with heartwarming gesture in dubai video goes viral bdg