PSL 2025, Sikandar Raza: क्रिकेट खेळण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नसतो. क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारे तुम्ही अनेक खेळाडू पाहिले असतील. पण आपल्या संघासाठी अंतिम सामना खेळण्यासाठी एका देशातून दुसऱ्या देशात जाणारा खेळाडू तुम्ही क्वचितच पाहिला असेल. पण झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू सिकंदर रझाने असं करून दाखवलं आहे. इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळून झाल्यानंतर, तो पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील अंतिम सामना खेळण्यासाठी २० मिनिटे शिल्लक असताना मैदानात दाखल झाला. कसा होता त्याचा प्रवास? जाणून घ्या.

इंग्लंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये चार दिवसीय कसोटी सामन्याचा थरार रंगला. ट्रेंट ब्रीजमध्ये पार पडलेल्या या सामन्यात सिकंदर रझाने दुसऱ्या डावात ६० धावांची खेळी केली. पण, झिम्बाब्वेला हा सामना एक डाव आणि ४५ धावांनी गमवावा लागला. हा सामना चार दिवस खेळवला जाणार होता. मात्र सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी निकाल लागल्याने, सिकंदर रझाकडे पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील अंतिम सामना खेळण्यासाठी लाहोरमध्ये जाण्याचा पर्याय होता.

सिकंदर रझाने इंग्लंडहून पाकिस्तानात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने आपल्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठी हा प्रवास केला आहे. मात्र, यावेळी त्याचा प्रवास आणखी खडतर होता.

त्याने इकॉनॉमी फ्लाईटने बर्मिंघम ते दुबई असा प्रवास केला. त्यानंतर अबूधाबीहून लाहोरला जाण्यासाठी फ्लाईट पकडली. तो लाहोरमध्ये पोहोचल्यानंतर, स्टेडियमच्या दिशेने जात होता. इतक्यात कर्णधार शाहीन आफ्रिदीने, सिकंदर रझा प्लेइंग इलेव्हेनमध्ये खेळणार असल्याची घोषणा केली.

या सामन्यात लाहोर कलंदर्स संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. या विजयानंतर त्याने माध्यमांशी बोलताना आपल्या अविश्वसनीय प्रवासाबाबत खुलासा केला. तो म्हणाला, “ परवा मी कसोटी सामन्यात २५ षटकं गोलंदाजी केली, काल २० षटकं फलंदाजी केली. बर्मिंघममध्ये रात्रीचं जेवण, दुबईत नाश्ता, अबुधाबीमध्ये दुपारचं जेवण करण्यासाठी प्रवास केला आणि रात्रीचं जेवण पाकिस्तानमध्ये. हेच एका क्रिकेटपटूचं आयुष्य आहे. मला हे आयुष्य अनुभवायला मिळत आहे, याचा मला अभिमान आहे.” सिकंदर रझाच्या या थक्क करणाऱ्या प्रवासानंतर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.