भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपने आपली घोडदौड कायम राखताना सिंगापूर खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. परंतु युवा खेळाडू एच. एस. प्रणॉयला मात्र पायाच्या दुखापतीमुळे उपांत्यपूर्व फेरीचा सामना सोडून द्यावा लागला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेतील सुवर्णपदकविजेत्या कश्यपने फ्रान्सच्या ब्रिके लेव्हरडेझचा ३० मिनिटांच्या लढतीत २१-६, २१-१७ असा पराभव केला. कश्यपने प्रतिस्पध्र्याला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. कश्यपने पहिल्या गेममध्ये प्रारंभी ६-१ अशी आघाडी घेतली. मग ही आघाडी ९-६ अशी वाढवली. त्यानंतर १२ सलग गुण मिळवत कश्यपने पहिला गेम खिशात घातला.
दुसऱ्या गेममध्ये कश्यपने सुरुवातीला ४-१ अशी आघाडी घेतली. मग ब्रिके ७-९ अशी मुसंडी मारली. परंतु त्यानंतर पुन्हा कश्यपने दमदार लढत देत दुसरा गेम जिंकला.
उपांत्य फेरीत कश्यपची हाँगकाँगच्या हू यूनशी गाठ पडणार आहे. कश्यपची त्याच्याविरुद्धची कामगिरी १-२ अशी आहे. हा एकमेव विजय कश्यपने २०१३ मध्ये जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेत मिळवला होता.
उपउपांत्यपूर्व लढतीत डेन्मार्कच्या जान जोर्गेनसेनविरुद्ध विजय मिळवताना प्रणॉयला दुखापत झाली होती. त्यामुळे शुक्रवारी तो मैदानावर उतरू शकला नाही. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जपानच्या केंटो मोमोटाला पुढे चाल देण्यात आली.
‘‘जोर्गेसेनविरुद्धच्या लढतीतील दुसऱ्या गेममध्ये मला दुखापत झाली. डॉक्टरांनी ४-५ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे लवकरच बरा होऊन मैदानावर परतेन, अशी आशा आहे,’’ अशी प्रतिक्रिया जागतिक क्रमवारीतील १४व्या स्थानावरील प्रणॉयने व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

   

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singapore open parupalli kashyap books semifinal berth