सेंट लुइस (अमेरिका) : जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशने सिंकेफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत विजयी पुनरागमन करताना दुसऱ्या फेरीच्या लढतीत उझबेकिस्तानच्या जलद (रॅपिड) प्रारूपातील माजी जगज्जेत्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोववर मात केली. पहिल्या फेरीत गुकेशला पराभूत करणाऱ्या भारताच्याच आर. प्रज्ञानंदने दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कारूआनाला बरोबरीत रोखले.

अन्य लढतीत फ्रान्सच्या अलिरेझा फिरूझाने पोलंडच्या यान-क्रिस्तोफ डुडाला पराभूत केले. अमेरिकेच्या लेव्हॉन अरोनियनने आपल्याच देशाच्या सॅम्युएल सॅव्हिएनविरुद्ध, तर अमेरिकेच्याच वेस्ली सो याने फ्रान्सच्या मॅक्सिम-व्हॅचिएर लाग्रेव्हविरुद्ध बरोबरीची नोंद केली. स्पर्धेच्या सात फेऱ्या शिल्लक असून प्रज्ञानंद, अरोनियन आणि फिरूझा १.५ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत. गुकेश, कारूआना, वेस्ली सो, सॅव्हिएन आणि व्हॅचिएर-लाग्रेव्ह संयुक्त चौथ्या स्थानी आहेत. डुडा अर्ध्या गुणासह नवव्या स्थानी आहे, सलग दोन लढती गमावणारा अब्दुसत्तोरोव तळाला आहे.

गुकेशने सुरुवातीपासून अब्दुसत्तोरोवला अडचणीत टाकले. अब्दुसत्तोरोवच्या राजाच्या प्याद्यावर गुकेशने दडपण राखले. गुकेशने हत्तीचे प्यादे बाद करत अश्वाला लक्ष्य केले. अब्दुसत्तोरोवने बचावाचा प्रयत्न केला. मात्र, त्याला चाली रचण्यासाठी बराच वेळ घ्यावा लागला. अखेर गुकेशने अचूक चाली रचत विजयाची संधी साधली.