सेंट लुइस : ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सिंकेफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेची दमदार सुरुवात करताना पहिल्या फेरीत भारतीय सहकारी जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशवर मात केली. या कामगिरीसह त्याने ‘लाइव्ह रेटिंग’च्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली.

अमेरिकेच्या सेंट लुइस येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत यजमान देशाच्या लेव्हॉन अरोनियनने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोवचा पराभव केला. त्यामुळे पहिल्या फेरीनंतर प्रज्ञानंद आणि अरोनियन संयुक्तपणे आघाडीवर होते. अन्य लढतींत, अमेरिकेचा फॅबियानो कारुआना आणि पोलंडचा यान-क्रिस्टोफ डुडा, अमेरिकेचे सॅम्युएल सॅव्हिएन आणि वेस्ली सो, फ्रान्सचे मॅक्सिम व्हॅचिएर-लाग्रेव्ह आणि अलिरेझा फिरुझा यांच्यात बरोबरी झाली.

गुकेशविरुद्ध पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रज्ञानंदने चमक दाखवली. गुकेशने सुरुवातीलाच चाली रचण्यासाठी वेळ घेतला. त्याने वजिराची अदलाबदल करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. मात्र, प्रज्ञानंदकडे उंटाचे दोन्ही मोहरे शाबूत असल्याने तो भक्कम स्थितीत राहिला. त्यानंतर गुकेशला वेळेचे गणित साधणे अवघड जाऊ लागले. दुसरीकडे प्रज्ञानंदने झटपट चाली रचून प्रतिस्पर्ध्यावर दडपण राखले.

अवघड स्थितीतून गुकेशला मार्ग काढता आला नाही आणि अखेरीस ३६ चालींनंतर त्याने हार मान्य केली. ‘‘आज नक्की काय झाले ते समजले नाही. गुकेश बहुधा लक्षपूर्वक खेळला नाही. गेल्या वर्षी, मी त्याच्याविरुद्ध विजयाची संधी दवडली होती. पारंपरिक प्रकारात (क्लासिकल) मी जवळपास दोन वर्षांपासून गुकेशला हरवू शकलो नव्हतो. त्यामुळे हा विजय खूप खास आहे,’’ अशी प्रतिक्रिया प्रज्ञानंदने व्यक्त केली.