भारताची स्टार फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधनाने महिला वनडे विश्वचषकात शतक झळकावलं आहे. २०२५ च्या आयसीसी महिला विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या ८८ चेंडूत मानधनाने तिचे धमाकेदार शतक पूर्ण केलं. हे तिचे २०२५ च्या महिला विश्वचषकातील पहिलं शतक आहे.
नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. भारताने सावध सुरूवात करत त्यानंतर दोन्ही सलामीवीरांनी शानदार फटकेबाजी सुरू केली. दोन्ही फलंदाजांनी कमालीची भागीदारी रचत भारताला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला.
स्मृती मानधना ९९ धावांवर असताना एक धाव घेत तिने अपलं शतक पूर्ण केलं. कर्णधार हरमनप्रीत कौरसह संपूर्ण संघाने उभं राहत टाळ्या वाजवत तिचं कौतुक केलं. संयमी खेळी करत प्रतिकाबरोबर स्मृतीने महत्त्वपूर्ण भागीदारी रचत विश्वचषक सामन्यात शतकी खेळी साकारली. महिला वनडे विश्वचषकात सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या यादीत स्मृती आता दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तर भारतासाठी महिला विश्वचषकात सर्वाधिक शतकं करणारी ती पहिली महिला फलंदाज ठरली. तिने १४ शतकं केली आहेत. स्मृतीने ८८ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह शतकी खेळी साकारली.
स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल २१२ धावांची भागीदारी केली. स्मृती मानधना सुझी बेट्सच्या गोलंदाजीवर ३४व्या षटकात झेलबाद झाली. रोवेलने स्मृतीला सीमारेषेजवळ झेलबाद केलं. बाद होण्यापूर्वी स्मृतीने ९५ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह १०९ धावांची खेळी केली.
महिला वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या फलंदाज
मेग लॅनिंग – १५ शतकं
स्मृती मानधना – १४ शतकं
सुझी बेट्स – १३ शतकं
टॅमी ब्यूमाँट – १२ शतकं
नताली स्किव्हर ब्रंट – १० शतकं
