Snake Disruption During IND vs PAK Training Session: आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेला दमदार सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेवर दमदार विजयाची नोंद केली. भारतीय संघाचा पुढील सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. हा सामना ५ ऑक्टोबरला कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ २ ऑक्टोबरला कोलंबोत दाखल झाला आहे. ३ ऑक्टोबरला भारतीय महिला खेळाडू सराव करण्यासाठी मैदानात उतरले. दरम्यान सराव करत असताना असं काही घडलं, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. पण पाकिस्तानचे सामने कोलंबोत खेळवले जाणार आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना कोलंबोत खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी ३ ऑक्टोबरला भारतीय खेळाडू सराव करण्यासाठी मैदानात उतरले होते. मात्र, सरावासाठी मैदानात उतरताच भारतीय खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला. पीटीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मैदानात साप दिसला, पण तो विषारी नसल्याची माहिती मिळाल्याने खेळाडूंनी सुटकेचा निःश्वास सोडला. ज्यावेळी खेळाडू नेट्समध्ये सराव करण्यासाठी जात होते, त्यावेळी स्टँडजवळ हा साप दिसला.
या सापाला पाहून भारतीय खेळाडू मुळीच घाबरले नाही. हे खेळाडू त्या सापाकडे पाहत उभे राहिले. पाकिस्तानविरूद्ध होणारा सामना हा भारतीय संघाचा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे.भारत आणि पाकिस्तानचा रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ११ वनडे सामन्यांमध्ये आमेनसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. महिलांच्या क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरूद्ध खेळताना भारतीय संघाच्या विजयाची सरासरी १०० टक्के आहे.
पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा दमदार विजय
या स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार विजयाची नोंद केली होती. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने ४७ षटकात ८ गडी बाद २६९ धावा केल्या होत्या. श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी २७० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी विजय मिळवण्यासाठी पू्र्ण जोर लावला. पण भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संपूर्ण डाव अवघ्या २११ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ५९ धावांनी आपल्या नावावर केला.