आयपीएल २०२५ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यासाठी जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण ही मालिका आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिलीच मालिका असणार आहे. या मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान संघाची घोषणा होण्यापूर्वी सोनी स्पोर्ट्सकडून समालोचकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
चेतेश्वर पुजारा करणार समालोचन
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी ‘द वॉल’ची भूमिका पार पाडली. राहुल द्रविडला बाद करण्यासाठी गोलंदाजांना घाम फुटायचा. राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटला रामराम केल्यानंतर ही भूमिका चेतेश्वर पुजाराने पार पाडली. भारतात खेळताना तो चमकला, यासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकांसारख्या देशांमध्येही खंबीरपणे उभा राहिला. मात्र त्याला फलंदाजीत सातत्य टिकवून ठेवता आलं नाही. त्यामुळे त्याला संघातील स्थान गमवावं लागलं आहे. ७ जून २०२३ मध्ये तो आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात कमबॅक करता आलेलं नाही. आता तो समालोचकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना चेतेश्वर पुजारा समालोचन करताना दिसून आला होता. आता सोनी स्पोर्ट्सकडून भारत – इंग्लंड कसोटी मालिकेसाठी इंग्रजी समालोचनासाठी समालोचकांची यादी जाहीर केली आहे. ज्यात चेतेश्वर पुजाराचा देखील समावेश करण्यात आला आहे. या यादीत पुजारासह, संजना गणेशन, हर्षा भोगले, सुनील गावस्कर, मायकल वॉ, मायकेल अथर्टन आणि नासीर हुसैन यांचा समावेश करण्यात आला आहे.
चेतेश्वर पुजाराचा रेकॉर्ड
चेतेश्वर पुजारा हा भारतीय कसोटी संघातील विश्वासू फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, आऊट ऑफ फॉर्म असल्यामुळे त्याला संघात स्थान मिळवता आलेलं नाही. २०२३ मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरूद्ध शेवटचा कसोटी सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर त्याला संघातील स्थान गमवावं लागलं. त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला भारतीय संघासाठी १०३ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.
यादरम्यान त्याने ४३.६ च्या सरासरीने ७१९५ धावा केल्या आहेत. ज्यात १९ शतकं आणइ ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान नाबाद २०६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.