भारतीय अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीने सोमवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३७ वर्षीय बिन्नी बराच काळ भारतीय संघाबाहेर होता. २०१६ पासून तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तो देशांतर्गत क्रिकेटद्वारे संघात परतण्याचा प्रयत्न करत होता. २०१४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या स्टुअर्ट बिन्नीने भारतासाठी सहा कसोटी, १४ एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळले आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नींचा तो मुलगा आहे.
वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम त्याच्या नावावर आहे. २०१४मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध चार धावा देऊन सहा विकेट्स घेतल्या. कोणताही भारतीय गोलंदाज आजपर्यंत त्याचा विक्रम मोडू शकलेला नाही.
While he did not get many international runs under his belt, Binny returned exceptional bowling figures against Bangladesh when he took six wickets for just four runs in an ODI in June 2014 in Dhaka.https://t.co/NZHJ79bpVX
— Express Sports (@IExpressSports) August 30, 2021
बिन्नीच्या कसोटी क्रिकेटमध्ये १९४ धावा आणि ३ विकेट, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २३० धावा आणि २० विकेट्स, टी-२० क्रिकेटमध्ये ३५ धावा आणि एक विकेट आहे. बिन्नीने ९५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४७९६ धावा केल्या आणि १४८ विकेट्स घेतल्या. १०० लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने १७८८ धावा काढण्याबरोबरच ९९ विकेट्सही घेतल्या.
यावर्षी मार्च महिन्यात बिन्नी शेवटचा मैदानावर उतरला. त्याचा १००वा प्रथम श्रेणी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. आपल्या शेवटच्या सामन्यात बिन्नीने नागालँडसाठी अरुणाचल प्रदेशविरुद्ध नाबाद ५५ धावांची खेळी केली.
हेही वाचा – मारुतीची स्विफ्ट कार खरेदी करताय तर सावधान..! क्रॅश टेस्टमध्ये या गाडीला..
स्टुअर्ट बिन्नी, त्याच्या वडिलांप्रमाणे मधल्या फळीतील फलंदाज आणि मध्यम वेगवान स्विंग गोलंदाज होता. सुरुवातीच्या टप्प्यात बिन्नी कर्नाटकच्या संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत होता. यानंतर, २००७ मध्ये त्याने इंडियन क्रिकेट लीगसाठी करार केला. तो हैदराबाद हिरोज आणि इंडिया इलेव्हनकडून खेळला.
अनधिकृत ठरलेल्या या स्पर्धेत दोन हंगाम खेळल्यानंतर, बिन्नीने बीसीसीआयच्या माफी प्रस्तावाला मान्यता दिली आणि लीग सोडली. यानंतर तो कर्नाटकच्या संघात परतला. त्याने संघासाठी कठीण काळात धावा केल्या आणि मोठ्या भागीदारी रचल्या. २०१३मध्ये त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय अ संघात निवड झाली आणि तेथे त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस पुढील वर्षी भारतासाठी एकदिवसीय पदार्पण करण्याच्या संधीच्या रूपात मिळाले.