अन्वय सावंत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘कसोटी क्रिकेटमध्ये ३५० बळी आणि चार शतके झळकावणारा रविचंद्रन अश्विनसारखा खेळाडू प्रत्येकच संघाला हवा असतो. मात्र भारतीय संघाकडून त्याला योग्य वागणूक मिळते आहे का? एखाद्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीमुळे त्याला पुढील सामन्यात संघाबाहेर केले जाते. अश्विनसाठी बहुधा इतरांपेक्षा वेगळे नियम आहेत!’’ भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी २०२०मध्ये ऑफ-स्पिनर अश्विनवर सातत्याने होणाऱ्या टीकेबाबत आपले परखड मत व्यक्त केले होते. त्यानंतरच्या एक-दीड वर्षांत अश्विनच्या खात्यावर आणखी ५०हून अधिक बळी (फलंदाजीत एक शतकही) जमा झाले आहेत. मात्र त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्याची मालिका सुरूच आहे.

३५ वर्षीय अश्विनने काही दिवसांपूर्वीच भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांचा ४३४ कसोटी बळींचा विक्रम मोडीत काढला. कसोटीत भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन (८६ सामन्यांत ४३६ बळी) आता दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. कपिल यांची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना केली जाते. त्यांचा कोणताही विक्रम मोडणे, हे खेळाडूसाठी खूप मोठे यश असते. त्यामुळेच अश्विनच्या कामगिरीची भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्तुती केली. ‘‘अश्विनने अनेक वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करताना दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मी त्याला सर्वकालीन महान खेळाडू मानतो,’’ असे रोहित म्हणाला.

मात्र त्याचे हे म्हणणे अनेकांना फारसे पटले नाही आणि यापैकी एक होते पाकिस्तानचे माजी यष्टिरक्षक रशीद लतिफ. ‘‘घरच्या मैदानावर एसजी चेंडूने खेळताना अश्विन भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू आहे. मात्र परदेशातील त्याची कामगिरी पाहता, रोहितच्या मताशी मी सहमत नाही,’’ अशी प्रतिक्रिया रशीद यांनी व्यक्त केली. अश्विनच्या परदेशातील, विशेषत: ‘सेना’ (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांतील कामगिरीबाबत कायमच चर्चा रंगते. घरच्या मैदानांवरील ५१ कसोटींत ३०६ बळी घेणाऱ्या अश्विनने ‘सेना’ देशांत मिळून २४ कसोटींत ७० बळी घेतले आहेत. तसेच कारकीर्दीत तब्बल ३० वेळा डावात पाच गडी बाद करणाऱ्या अश्विनला ‘सेना’ देशांमध्ये ही कामगिरी एकदाही करता आलेली नाही. त्यामुळेच त्याला मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे या नामांकित फिरकीपटूंच्या पंगतीत स्थान दिले जात नाही. मात्र अश्विनवरील टीका खरेच रास्त आहे का?

‘आयपीएल’ आणि मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतील प्रभावी कामगिरीच्या बळावर अश्विनला २०११मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी लाभली. या संधीचे सोने करताना त्याने पहिल्याच सामन्यात नऊ गडी बाद केले. त्यानंतर अश्विनने सातत्यपूर्ण कामगिरीसह कसोटीतील स्थान भक्कम केले. पुढे अश्विनला डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाची साथ मिळाली आणि या जोडीने भारतात होणाऱ्या कसोटी सामन्यांत प्रतिस्पर्धी संघांतील फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची मालिकाच सुरू केली.

क्रीजचा योग्य वापर, वेगवेगळय़ा कोनांतून गोलंदाजी करून फलंदाजांच्या डोक्यात प्रश्न उपस्थित करण्याची क्षमता, दीर्घकाळ एकाच टप्प्यावर गोलंदाजी, तसेच गोलंदाजीच्या शैलीत बदल करून ऑफ-स्पिनसह दुसरा, कॅरम बॉल आणि अगदी लेग-स्पिनचाही वापर या कौशल्यांमुळेच अश्विनने सर्वात जलद प्रत्येकी १००, २००, ३०० आणि ४०० कसोटी बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले. मात्र परदेशातील कामगिरीने अश्विनचा पिच्छा पुरवला.    

गेल्या काही वर्षांत भारताच्या जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांसारख्या भारतीय वेगवान गोलंदाजांनी कामगिरी उंचावली. त्यामुळे परदेशातील कसोटी सामन्यांत भारताला अश्विन आणि जडेजापैकी एकाला संघातून वगळणे भाग पडले. अश्विनच्या तुलनेत जडेजाची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दर्जेदार मानले जाते. त्यामुळे बहुतांश वेळा अश्विनवरच संघाबाहेर बसण्याची वेळ येते. तसेच अश्विनला त्याचा स्पष्टवक्तेपणाही महागात पडल्याचे बरेचदा बोलले गेले. ‘‘संघाच्या बैठकीत एखादा निर्णय पटलेला नसतानाही अन्य बरेचसे खेळाडू आपले मत मांडत नाहीत, परंतु अश्विन असहमती दर्शवण्यास घाबरत नाही,’’ असे गावस्कर म्हणाले होते.     

केवळ परदेशातील कामगिरीच्या आधारे एखाद्या गोलंदाजाची गुणवत्ता ठरवणे उचित नाही. सर्वाधिक ८०० बळी घेणाऱ्या श्रीलंकेच्या मुरलीधरनचा कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांक लागतो. यापैकी ६१२ बळी त्याने आशियामध्ये मिळवले. मग त्याच्यासाठी एक न्याय आणि अश्विनसाठी वेगळा का? अश्विन दशकभराहूनही अधिक काळ भारताचे प्रतिनिधित्व करत असून यापैकी अनेक वर्षे भारतीय संघ जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी होता. भारताने जिंकलेल्या सामन्यांत त्याने ९७ डावांत ३०४ गडी बाद केले हे विशेष. आता तो आगामी काळात कशी कामगिरी करतो आणि भारताला किती सामने जिंकवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

anvay.sawant@expressindia.com

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunday special quality question test cricket players proper treatment rules ysh