Sunil Gavaskar Singing and Dancing After India Win: ओव्हल कसोटी भारताने दणदणीत विजय मिळवला. मोहम्मद सिराजचे ९ बळी आणि प्रसिध कृष्णाच्या साथीने युवा टीम इंडियाने इंग्लंडला पराभवाचं पाणी पाजलं. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी ४ विकेट्सची गरज असताना सिराज आणि प्रसिधने भेदक गोलंदाजी करत विजय मिळवून दिला. या विजयानंतर ओव्हलच्या मैदानावरील चाहत्यांनीही कमालीचं सेलिब्रेशन केलं. यामध्ये दिग्गज सुनील गावस्करही मागे राहिले नाहीत.
सुनील गावस्कर कायमचं भारताच्या विजयाचं सेलिब्रेशन करताना दिसले आहेत. कधी लहान मुलाप्रमाणे मैदानात नाचत तर कधी उड्या मारत त्यांना विजयाचं सेलिब्रेशन केलं आहे. आता ओव्हल कसोटीतील टीम इंडियाच्या विजयानंतर गावस्करांनी इंग्लंडच्या भूमीवर उभं राहून ‘मेरे देश की धरती…’ हे गाणं गायलं आहे. भारताच्या इतर कॉमेंटेटर्सने देखील त्यांना साथ दिली.
सुनील गावस्करांनी लकी जॅकेट घालत इंग्लंडमध्ये विजयानंतर गायलं गाणं
कसोटी सामन्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर, सुनील गावस्कर मैदानावर आले आणि त्यांनी गाणं गात अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला. मैदानावर उतरून त्यांनी देशभक्तीपर गीत गायलं. टीम इंडियाच्या विजयी फेरीनंतर, सुनील गावस्कर ओव्हलच्या मैदानावर ‘मेरे देश की धरती सोना, उगले-उगले हीरे मोती…’ हे गाणं गात त्यावर डान्स करत होते. गाण्याच्या वेळी सुनील गावस्कर यांनी त्यांचं तेच लकी जॅकेट घातले होते, जे त्यांनी गाबा २०२१ मध्ये टीम इंडियाच्या विजयादरम्यान देखील घातलं होतं.
सुनील गावस्करांनी चौथ्या दिवसाच्या अखेरीस कर्णधार गिलची भेट घेऊन त्याला गिफ्ट दिलं होतं. तो गावस्करांचा कसोटी मालिकेतील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडेल यासाठी त्यांनी त्याच्यासाठी गिफ्ट आणलं होतं. ज्यामध्ये SG लिहिलेलं टीशर्ट आणि गावस्करांची सही असलेली कॅप होती. गिलला गिफ्ट दिल्यानंतर त्यांनी त्याला अखेरच्या दिवसासाठी शुभेच्छा दिल्या आणि मी उद्यासाठी लकी जॅकेट घालणार आहे असंही त्यांनी सांगितलं होतं.
गावस्करांचं लकी जॅकेट भारताच्या विजयामुळे खरोखरचं पुन्हा एकदा लकी ठरलं. भारताने गाबानंतर इंग्लंडमध्येही ऐतिहासिक विजय नोंदवला. भारताच्या संपूर्ण संघाने ओव्हल कसोटी विजयात आपली भूमिका निभावली आहे. मोहम्मद सिराज या सामन्याचा सामनावीर ठरला, ज्याने ९ विकेट्स घेतल्या.