भारताच्या वरिष्ठ हॉकी संघात स्थान मिळालेल्या सूरज करकेराचे मत

भारताच्या वरिष्ठ पुरुष हॉकी संघात मुंबईचा गोलरक्षक सुरज करकेरा याची निवड अनपेक्षित मानली जात आहे. गतवर्षी झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पध्रेतील विजेत्या संघातील गोलरक्षकाला डावलून सूरजची निवड ही सर्वाना बुचकळ्यात टाकणारी आहे. स्वत: सूरजलाही हे अनपेक्षित तसेच वाटते. ‘‘भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळेल हे अपेक्षित नव्हते. वरिष्ठ खेळाडूंच्या सराव शिबिरात पहिल्यांदाच सहभागी झालो होते. त्यामुळे मी उत्साही होतोच; पण सुलतान अझलन शाह चषक स्पध्रेत संघाचा एक भाग असणे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,’’ असे सूरजने सांगितले. भारतीय संघातील मुंबईच्या खेळाडूंच्या संख्येबाबत त्याला छेडले असता तो म्हणाला, ‘‘मुंबईत गुणवंत खेळाडूंची कमतरता नाही. त्यांना योग्य वेळी चांगला खेळ करून राष्ट्रीय संघात स्थान निर्माण करता येत नाही. केवळ गुणवत्ता असून चालत नाही, तर त्याला मेहनतीची योग्य जोड हवी. मुंबईच्या खेळाडूंनी तो मोक्याचा क्षण हेरायला हवा.’’

मार्च महिन्यात प्रशिक्षक रोअलंट ओल्टमन्स यांनी राष्ट्रीय शिबिरासाठी जाहीर केलेल्या ३३ सदस्यीय संभाव्य खेळाडूंमध्ये पी. आर. श्रीजेशसह, आकाश चिकटे, विकास दाहिया आणि सूरज या गोलरक्षकांचा समावेश होता. त्यापैकी श्रीजेशचे वरिष्ठ संघातील स्थान हे निश्चितच होते आणि राखीव गोलरक्षकासाठी चिकटे, दाहिया व सूरज यांच्यात चढाओढ होती. कनिष्ठ विश्वचषक स्पध्रेतील चिकटेची कामगिरी पाहता, तो या स्थानासाठी पात्र ठरत होता. तो म्हणाला, ‘‘कनिष्ठ संघात विकास व आकाश यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली असताना भारताचा सर्वात यशस्वी गोलरक्षक  श्रीजेशसोबत खेळण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद आहे. हॉकी इंडिया लीगमधील कामगिरीमुळे कदाचित रोअलंट ओल्टमन्स यांनी निवड केली असावी.’’

तो पुढे म्हणाला की, ‘‘अंतिम संघात खेळण्याची संधी मिळाली तर तिचे सोने करण्याचा प्रयत्न असेल. संघातील स्थान कायम राखण्यासाठी अथक परिश्रम घेण्याची तयारी आहे. वरिष्ठ खेळाडूंसोबत खेळून बरेच काही शिकायला मिळते आणि खेळातही सुधारणा होत जाते. श्रीजेश सर आमच्या चुका सुधारण्यावर अधिक भर देतात आणि त्यामुळे आम्हालाही चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. दुसरी फळी निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. म्हणून ते कनिष्ठ खेळाडूंना सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचे सल्ले देत असतात.’’