Asia Cup 2025 Captain Photo Controversy: आशिया चषक २०२५ चा विजेता कोण? याची उत्सुकता आता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. आशिया चषकात ४१ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येत आहेत. याआधी भारताने पाकिस्तानला याच चषकात दोन वेळा पराभूत केलेले आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ या सामन्यात पूर्ण ताकदीनिशी उतरेल, असे पाकिस्तानचे माजी खेळाडू सांगत आहेत. तर भारतानेही पाकिस्तानला तिसऱ्यांदा पराभव भेट देण्याची तयारी केली आहे. तत्पूर्वी अंतिम सामन्यापूर्वी होणाऱ्या फोटोशूटसाठी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं नकार दिला आहे. हस्तांदोलन टाळल्यानंतर सूर्यकुमारनं फोटोशूटही टाळले आहे. यानंतर पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार सलमान अली आगा यानं प्रतिक्रिया दिली.
आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यावर अनेकांच्या नजरा आहेत. हा सामना आता फक्त क्रिकेटपुरता मर्यादीत राहिला नसून पाकिस्तानी खेळाडूंनी केलेल्या हातवारे आणि शाब्दिक प्रतिक्रियांमुळे त्याला राजकीय रंगही लागला आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान आगाने म्हटले, “आमच्या संघावर दबाव आहे. तसा भारतीय संघावरदेखील दबाव आहे. फक्त एकच संघ दबावात असल्याचे कुणी म्हटले तर ते चुकीचे ठरेल.”
आधीच्या दोन सामन्यात पराभव पत्करूनही तिसरा सामना आम्ही नक्की जिंकू, असा विश्वास सलमानने व्यक्त केला. भारताच्या बाजूने आकडेवारी असली किंवा भारताचा संघ अधिक फॉर्मात असला तरी पाकिस्तानच्या विजयाबाबत सलमान आगा आशावादी आहे.
“आम्ही जिंकू. आमचा प्रयत्न सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याचा आहे. आम्ही सर्वोत्तम क्रिकेट खेळलो आणि ४० षटकात आमच्या योजना योग्यरितीने अमलात आणल्या तर आम्ही नक्कीच भारताचा पराभव करू शकू”, असा विश्वास सलमान आगाने सामन्यापूर्वी बोलताना व्यक्त केला. एनडीटीव्ही स्पोर्ट्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
सूर्यकुमार यादवच्या बहिष्कारावर म्हणाला…
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने फोटोशूटवर टाकलेल्या बहिष्काराबाबत बोलताना सलमान आगा म्हणाला, “त्याला फोटोशूटसाठी याचे की नाही, हा निर्णय सर्वस्वी सूर्यकुमारचा आहे. मी त्यात काहीच करू शकत नाही.”
पाकिस्तान संघाबरोबर आमची तुल्यबळ स्पर्धा नाही, असे विधान सूर्यकुमार यादवने दुसऱ्या सामन्यानंतर केले होते. या विधानावर बोलताना सलमान आगा म्हणाला, “आम्ही आधीच्या दोन सामन्यात भारताहून अधिक चुका केल्या आहेत. त्यामुळेच आम्हाला विजय मिळू शकला नाही. आज जो कमीतकमी चुका करेल, तो सामना जिंकेल.”