Suryakumar Yadav Statement on Handshake Snub Controversy: आशिया चषकात भारताने पाकिस्तानविरूद्ध सामन्यात ७ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. सामन्यापेक्षा सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या वागण्याने सर्वांचं लक्ष वेधलं. टीम इंडियाने पाकिस्तानातील एकाही खेळाडूशी हस्तांदोलन केलं नाही किंवा कोणत्याच प्रकारची चर्चा किंवा संवाद साधला नाही. सामन्यानंतरही भारताच्या संघाने पाकिस्तानविरूद्ध हात मिळवण्यास नकार दिला. याबाबत कर्णधार सूर्यकुमार यादवने वक्तव्य केलं आहे.

आशिया चषक २०२५ मध्ये भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याच्या संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. नाणेफेकीदरम्यान देखील सूर्याने सारखाच पवित्रा घेतला होता आणि सामना संपल्यावरही हस्तांदोलन करण्यासाठी कोणताही भारतीय खेळाडू मैदानावर आला नाही. संपूर्ण सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंपासून पुरेसे अंतर राखले.

भारताने सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हात का नाही मिळवला? सूर्याने सांगितलं कारण

कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर सांगितलं की पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय का आणि कसा घेण्यात आला. संघाने याला कसे पाठिंबा दिला.

सूर्यकुमार यादव हस्तांदोलन न करण्याबाबत म्हणाला, “आम्ही बीसीसीआय आणि सरकारशी पूर्णपणे सहमत आहोत. आम्ही फक्त खेळण्यासाठी इथे आलो आहोत, असा निर्णय आम्ही घेतला होता आणि आम्ही त्यांना आमच्या खेळातून चोख प्रत्युत्तर दिलं. काही गोष्टी या खेळभावनेच्या पलीकडे असतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आप्तस्वकीय गमावलेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. मी म्हटल्याप्रमाणे हा विजय आम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या भारतीय लष्कराला समर्पित करत आहोत.”

सूर्यकुमारच्या भूमिकेचा पाकिस्तानी संघावर मोठा परिणाम झाला, ज्यांना भारतीय कर्णधाराच्या वर्तनामुळे त्यांचा अपमान झाल्याचं वाटलं. त्यामुळे पाकिस्तानच्या कर्णधाराने प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी न जाण्याचा निर्णय घेतला.

सूर्यकुमार यादवने विजयी षटकार लगावला आणि शिवम दुबेसह तो मैदानाबाहेर निघाला. भारतीय संघाने डगआऊटमध्ये भारताच्या विजयाचा आनंद साजरा केला आणि संपूर्ण संघ कर्णधारासह ड्रेसिंग रूममध्ये गेला. कोणत्याही भारतीय खेळाडूने पाकिस्तानशी हस्तांदोलन केलं नाही किंवा खेळाडू मैदानावर उतरले नाहीत. पाकिस्तानचा संघ हे दृश्य पाहून अवाक् झाला होता.

पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर टीम इंडियाची हस्तांदोलन करण्यासाठी वाट पाहत होते. पण भारतीय खेळाडू काही मैदानावर उतरले नाहीत. पाकिस्तानचे माजी खेळाडूदेखील भारताच्या हस्तांदोलन न करण्याबाबत वक्तव्य करत आहेत.