टी २० विश्वचषकात गजविजेत्या वेस्ट इंडिज संघाचा सलग दुसरा पराभव झाला आहे. वेस्ट इंडिजनं ८ गडी गमवून १४३ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १४४ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेनं २ गडी गमवून १८ षटकं आणि चेंडूत पूर्ण केलं. सलग दोन पराभवामुळे वेस्ट इंडिजचा पुढचा प्रवास खडतर झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा डाव
वेस्ट इंडिजने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच षटकात धक्का बसला. टेम्बा बवुमा धावचीत होत तंबूत परतला. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी रीझा हेन्ड्रिक्स आणि रस्सी वॅनदर दुस्सेननं अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात अकिल होसैनला यश आलं. रीझाने ३० चेंडूत ३९ धावा केल्या. त्यानंतर दुस्सेन आणि मारक्रमनं विजयी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. मारक्रमने २६ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. त्याने ४ षटकार आणि २ चौकार मारले. तर दुस्सेननं ५१ चेंडूत नाबाद ४३ धावा केल्या.

वेस्ट इंडिजचा डाव
पहिल्या पाच षटकात वेस्ट इंडिजच्या सलामीच्या फलंदाजांनी संथगतीने खेळी केली. दहा षटकात बिनबाद ६६ धावा आल्या. पहिल्या गड्यासाठी सिमॉन्स आणि इविन लेव्हिसनं ७३ धावांची भागीदारी केली. मात्र सिमॉन्स रबाडाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने ३५ चेंडूत १६ धावा केल्या. त्यानंतर केशव महाराजच्या गोलंदाजीवर पूरन बाद झाला. १२ धावा करून तंबूत परतला. इविननं आपलं अर्धशतक झळकावलं. त्याने ३५ चेंडूत ५६ धावा केल्या. केशव महाराजच्या गोलंदाजीवर रबाडाने त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. ख्रिस गेलही विशेष काही धावा करू शकला नही. १२ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. ड्वेन प्रेटोरिअसच्या गोलंदाजीवर हेनरिच क्लास्सेननं त्याचा झेल घेतला. आंद्रे रसेलच्या रुपाने वेस्ट इंडिजला पाचवा धक्का बसला. अनरिचच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. त्यानंतर आलेला शिमरॉन हेटमायरही धावचीत झाला. त्याने २ चेंडू खेळत १ धाव केली. पोलार्डने आक्रमक खेळी करत मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही अपयश आलं. प्रेटोरिअरसच्या गोलंदाजीवर बाद होत माघारी आला. त्याने २० चेंडूत २६ धावा केल्या. त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवर हेडन वॉल्श बाद झाला.

या सामन्यासाठी क्विंटन डिकॉकला आराम देण्यात आला. वैयक्तिक कारणास्तव खेळत नसल्याचं कर्णधार टेम्बा बवुमा याने सांगितलं. त्याच्या ऐवजी संघात रीझा हेन्ड्रिकला स्थान देण्यात आलं होतं.

वेस्ट इंडिजचा संघ- लेंडल सिमॉन्स, इविन लेव्हिस, ख्रिस गेल, शिरमॉन हेडमायर, ड्वेन ब्रावो, निकोलस पूरन, किरोन पोलार्ड, अँद्रे रसेल, अकिल होसैन, हेडन वॉल्श ज्यूनिअर, रवि रामपॉल

दक्षिण आफ्रिकेचा संघ- टेम्बा बवुमा, रीझा हेन्ड्रिक, रसी वॅ दर दुस्सेन, एडन मारक्रम, डेविड मिलार, हेनरिच क्लासेन, ड्वीन प्रेटोरिअर, कासिगो रबाडा, केशव महाराज, अनरिच नोर्तजे, टबरेज शाम्सी