करोनामुळे जागतिक क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला असताना ऑक्टोबर महिन्यात पुरुषांची ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा वेळापत्रकानुसारच होईल, अशी आशा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केली आहे.
करोनामुळे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेट सामने स्थगित करण्यात आले आहेत. परंतु येत्या काही आठवडय़ांत सर्व क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू होतील, अशी आशा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख केव्हिन रॉबर्ट्स यांनी व्यक्त केली आहे.
‘‘सध्याच्या परिस्थितीत आपण कुणीही तज्ज्ञ नाही. परंतु ऑक्टोबर-नोव्हेंबपर्यंत परिस्थिती सुरळीत होईल आणि पुरुषांची ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा व्यवस्थित होऊ शकेल,’’ असे रॉबर्ट्स यांनी सांगितले.विश्वचषक स्पर्धेचे पूर्वपात्रता सामने १८ ते २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत, तर मुख्य स्पर्धेला २४ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. याचप्रमाणे अंतिम सामना १५ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे.