अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर आता तालिबानने क्रिकेट बोर्डाच्या कार्यालयातही घुसखोरी केली आहे. गुरुवारी तालिबानी दहशतवाद्यांनी काबुलमधील अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मुख्य कार्यालयात प्रवेश केला. सोशल मीडियावर यासंबंधी एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात तालिबानी दहशतवादी एके-४७ घेऊन क्रिकेट बोर्डाच्या कार्यालयात घुसले आहेत. माजी फिरकीपटू अब्दुल्लाह मजारीही त्यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे.

अब्दुल्लाह मजारी हा डावखुरा फिरकीपटू असून त्याने अफगाणिस्तानसाठी दोन एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. या व्यतिरिक्त, या खेळाडूने २१ प्रथम श्रेणी सामने, १६ लिस्ट ए आणि १३ टी-२० सामने देखील खेळले आहेत. अब्दुल्लाह मजारी काबूल ईगल्सचा खेळाडू आहे. हा शपागिझा टी-२० लीगचा संघ आहे. अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू राशिद खान अब्दुल्लाह मजारीसोबत काबुल ईगल्ससाठी सामने खेळला आहे.

 

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद शेनवारी यांनी दावा केला आहे, की तालिबानकडून अफगाण क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही धोका नाही. शेनवारी म्हणाले, ”तालिबानला क्रिकेट आवडते आणि संघ टी-२० विश्वचषकात सहभागी होईल. याशिवाय, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड १० ते २५ सप्टेंबर दरम्यान शापगिझा क्रिकेट लीग आयोजित करण्याचा दावा करत आहे.”

महिला संघाचे अस्तित्व धोक्यात

तालिबान महिलांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे आणि आता अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर येताच या देशाच्या महिला क्रिकेट संघाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या वर्षीच अफगाणिस्तानने पहिल्यांदाच २५ महिला खेळाडूंना केंद्रीय करार दिले होते. जर तालिबानमुळे अफगाणिस्तान महिला संघ तुटला, तर हा देश आयसीसीचा पूर्ण सदस्य राहू शकणार नाही. सध्या अफगाणिस्तानचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडमध्ये द हंड्रेड स्पर्धा खेळत होते आणि आता ते यूएईमध्ये आयपीएलमध्ये खेळतानाही दिसतील, पण हे खेळाडू त्यांच्या कुटुंबाबद्दल चिंतेत आहेत.