पुलवामा हल्ल्यात हौतात्म्य स्विकारलेल्या जवानांबद्दल आदर दाखवण्यासाठी भारतीय संघ ‘आर्मी कॅप’ घालून मैदानात उतरला. यावेळी भारतीय संघाने एका सामन्याचं मानधन लष्कर मदत निधीला देत सर्व देशवासियांनाही यामध्ये सहभाग घ्यायला सांगितला. मात्र भारतीय संघाचं हे काम पाकिस्तानच्या डोळ्यात खुपले. याबाबत भारतीय क्रिकेट संघावर कारवाई करावी, अशी मागणी पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद खान यांनी केली होती. मात्र ‘आर्मी कॅप’ घालून खेळण्याआधीच ICCकडून याबाबतची परवानगी घेण्यात आली होती, असे BCCI ने स्पष्ट केले आहे.
आर्मी कॅप घालून भारतीय संघाने क्रिकेटमध्ये राजकारण घुसवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबद्दल आयसीसीकडे तक्रार दाखल करावी. जर भारतीय संघाने आर्मी कॅप घालणं थांबवलं नाही, तर पाकिस्तान संघही विश्वचषकात, काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधात काळ्या फिती लावून मैदानात उतरेल, असे मत त्यांनी डॉन वृत्तपत्राशी बोलत असताना मांडले होते. याचसोबत पाकिस्तानमधील प्रसिद्ध पत्रकार ओवैस तोहीद, मझहर अब्बास यांनीही भारतीय संघाच्या या कृत्याबद्दल नापसंती दर्शवली होती.
याबाबत टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार BCCI ने ICC चे CEO डेव्ह रिचर्डसन यांच्याकडे भारतीय खेळाडूंनी आर्मी कॅप घालून मैदानात उतरण्याबाबत परवानगी मागितली होती. तसेच यामागचा उद्देशदेखील स्पष्ट करण्यात आला होता. त्यानंतर ICC परवानगी दिली म्हणूनच भारतीय खेळाडू आर्मी कॅप घालून मैदानात उतरले, असे ICC शी संबंधित सूत्रांनी सांगितले आहे.
पुलवामा हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. यानंतर विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी जोर धरत होती. BCCI ने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडण्याचे प्रयत्न केले. मात्र आयसीसीने बीसीसीआयच्या मागणीवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं म्हटले होते.
