पहिल्या डावात १९२ धावांची आघाडी, सलामीवर शिखर धवन आणि विराट कोहलीचे शतक, आर.अश्विनच्या १० विकेट्स, अजिंक्य रहाणेचे ८ झेल, अशी दमदार कामगिरी झाली असतानाही भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची गॉल कसोटी गमावली आहे. कसोटीचा चौथा दिवस निर्णायक ठरला. भारतासमोर विजयासाठी १७६ धावांचे आव्हान ठेवलेल्या यजमानांनी चौथ्या दिवशी सामन्यात पुनरागमन करीत भारताचा डाव ११२ धावांत गुंडाळला. श्रीलंकेकडून रंगना हेराथ याने ७ विकेट्स काढल्या. १७६ धावांच्या कमकुवत आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूला मैदानात जम बसवता आला नाही. ठराविक अंतरानंतर भारतीय संघाचे एकामागोमाग एक विकेट्स पडत राहिल्या आणि यजमानांनी आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ३६ धावा केल्या, तर शिखर धवन देखील यावेळी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. धवन २८ धावांवर माघारी परतला. कौशलने विराट कोहलीचा मोठा अडथळा दूर केला. कौशलने कोहलीला अवघ्या ३ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर रंगना हेराथने भारताच्या सात खेळाडूंना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढले आणि संघाला सहज विजय मिळवून दिला. या विजयासह श्रीलंकेने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या संघाचा डाव १८३ धावांत संपुष्टात आणला होता. त्यानंतर भारतीय फलंदाजांना दमदार फलंदाजी करीत ३७५ धावा ठोकून यजमानांवर १९२ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱया डावात श्रीलंकेकडून दिनेश चंडिमलने १६७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून संघाला १७६ धावांची आघाडी मिळवून दिली. पण हे आव्हान गाठण्यासाठी भारतीय फलंदाजांसमोर दोन दिवसांच्या कालावधी होता. त्यामुळे विजयाचे पारडे भारतीय संघाचे बाजूने होते. पण सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी निर्णायक भूमिका बजावून भारताला ११२ धावांत गुंडाळले आणि विजयश्री खेचून आणली.