माल्मो (स्वीडन) : भारताचा युवा ग्रँडमास्टर निहाल सरिन याने जोमाने पुनरागमन करत जागतिक कनिष्ठ गटातील विजेत्या परहॅम माघसोडलो याच्यावर मात करत टेपे सिगमन अँड कंपनी बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेर जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले आहे.
१७-श्रेणीतील गटाच्या दोन फेऱ्या शिल्लक असून निहाल हा जर्मनीचा लिविऊ-डायटर निसिपेनू आणि स्वीडनच्या निल्स ग्रँडेलियस याच्यासह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहे. निहालने सुरेख सुरुवात करत सुरुवातीच्या चालींपासूनच इराणच्या माघसोडलो याच्यावर दडपण आणले. केरळच्या निहालने डावाच्या मध्यात माघसोडलोचा वजीर पटकावला आणि त्यानंतर विजय संपादन केला.
भारताचा अव्वल मानांकित बुद्धिबळपटू पी. हरिकृष्ण याने क्रोएशियाच्या इव्हान सारिकविरुद्धची लढत बरोबरीत सोडवत ३.५ गुणांसह अग्रस्थान कायम राखले आहे. इंग्लंडच्या गवैन जोन्स याने निसिपेनूविरुद्धची लढत बरोबरीत सोडवत ३.५ गुणांची कमाई केली आहे.