भारताच्या पी. व्ही. सिंधूने थायलंड ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का टुनजूंगचा २३-२१, १६-२१, २१-९  असा पराभव केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या सेटच्या सुरुवातीपासून सिंधूने आक्रमक खेळाला सुरुवात केली होती. मात्र इंडोनेशियाच्या ग्रेगोरियानेही सिंधूला कडवी टक्कर देत मोठी आघाडी घेण्याची संधी दिली नाही. पहिल्या सेटमध्ये सिंधूने आपले ठेवणीतले स्मॅशचे फटके वापरत ग्रेगोरियाला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. याचा सिंधूला काहीकाळासाठी फायदाही झाला. मात्र मध्यांतरानंतर ग्रेगोरियाने सिंधूला चांगलचं थकवलं. मात्र सिंधूने आपल्या ब्रम्हास्त्रावर विश्वास ठेवत स्मॅशच्या फटक्यांचा भडीमार केला आणि ग्रेगोरियाची झुंज २३-२१ अशी मोडून काढली.

दुसऱ्या सेटमध्ये पहिल्या काही मिनीटांमध्ये दोन्ही खेळाडू बरोबरीत खेळत होत्या. मात्र सिंधूने आपल्या खेळाची गती वाढवत ३ गुणांची आघाडी घेतली. मध्यांतरापर्यंत सिंधू आपली आघाडी कायम राखणार असं वाटत असतानाच ग्रेगोरियाने दमदार पुनरागमन करत सिंधूला धक्का दिला. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत ग्रेगोरियाने ११-९ अशी आघाडी घेतली. कोर्ट आणि नेटच्या जवळ फटके खेळून ग्रेगोरियाने सिंधूला बुचकळ्यात पाडलं. आपल्या चतुर खेळाच्या जोरावर ग्रेगोरियाने सिंधूला दुसऱ्या सेटमध्ये दमवण्यास सुरुवात केली. मध्यांतरानंतर सिंधूने ग्रेगोरियाला टक्कर देत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र २१-१६ च्या फरकाने दुसरा सेट जिंकत ग्रेगोरियाने सामना निर्णायक सेटमध्ये नेला.

तिसऱ्या सेटमध्येही दोन्ही खेळाडू तोडीस तोड खेळ करत होत्या. मात्र सिंधूने यावेळी आपला सर्व अनुभव पणाला लावत ग्रेगोरियाला बॅकफूटला ढकललं. मध्यांतरापर्यंत सिंधूकडे ११-७ अशी आघाडी होती. मध्यांतरानंतर सिंधूला सामन्यात आव्हान मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र आक्रमक खेळ करुन सिंधूने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला संधीच दिली नाही. मध्यांतरानंतर ग्रेगोरियाला केवळ २ पॉईंट देत सिंधूने तिसरा सेट २१-९ या फरकाने खिशात घालत सामना आपल्या नावावर केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thailand open badminton 2018 p v sindhu enters final beat indonesia opponent in semi final