न्यूझीलंडने भारताला ८ गड्यांनी मात देत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी विशेष जर्सी परिधान केलीहोती. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदी याच जर्सीचा आता लिलाव करणार आहे. दुर्मीळ प्रकारच्या कर्करोगाने ग्रस्त आठ वर्षांच्या मुलीच्या उपचारासाठी साऊदीने हा निर्णय घेतला आहे. या जर्सीवर न्यूझीलंडच्या सर्व क्रिकेटपटूंच्या सह्या आहेत.

होली बिट्टी असे या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या मुलीचे नाव आहे. २०१८ पासून ती न्यूरोब्लास्टोमाने ग्रस्त आहे. ३२ वर्षीय साऊदी म्हणाला, ”दोन वर्षांपूर्वी मला बिट्टीच्या आजारपणाविषयी समजले. तेव्हापासूनच मी तिला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. मी तिच्या उपचारासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये घातलेल्या जर्सीचा लिलाव करत आहे. लिलावातून मिळालेले सर्व पैसे बिट्टीच्या कुटुंबीयांना दिले जातील.” बिट्टीवर सध्या स्पेनमध्ये उपचार सुरू आहेत.

 

हेही वाचा – तुरुंगात गेलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू आता बनणार अंपायर!

अशी रंगली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल

अचूक रणनिती, संघातील खेळाडूंची योग्य निवड, प्रतिस्पर्ध्यांच्या कमकुवत बाजूंची माहिती आणि हवामानाचा अभ्यास या सर्व घटकांच्या जोरावर न्यूझीलंडने बलाढ्य भारताला ८ गड्यांनी पराभूत करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. या सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे वाया गेला. नाणेफेक जिंकलेल्या न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्या डावात भारताला २१७ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने भारताला जखडून ठेवत १७० धावांवर गुंडाळले. राखीव दिवसापर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडला भारताकडून ५३ षटकात १३९ धावांचे लक्ष्य मिळाले होते.

टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे लवकर माघारी परतल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात २ बळी घेणाऱ्या न्यूझीलंडच्या काईल जेमीसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.