चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अंतिम सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तानी संघ समोर असल्याने सामन्याबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचा अंतिम सामना, त्यात रविवार आणि त्यातही पाकिस्तानचे आव्हान यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना ‘सुपर संडे’ची अपेक्षा होती. मात्र सामना जसाजसा पुढे सरकला, तसतसा अपेक्षाभंग होत गेला.

आधी भारतीय गोलंदाजांनी अतिशय स्वैर मारा केला. त्यामुळे पाकिस्तानने तब्बल ३३८ धावांचे आव्हान उभे केले. पाकिस्तानची फलंदाजी संपूर्ण स्पर्धेत फारशी चमकदार झाली नव्हती. याउलट फलंदाजी नेहमीप्रमाणे याही स्पर्धेत भारतीय संघाचे बलस्थान होती. रोहित शर्मा आणि शिखर धवनने तर यंदाच्या स्पर्धेत सुरेख फलंदाजी केली होती. यासोबतच मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची भारतीय संघाची क्षमता क्रिकेटप्रेमींना माहित होती. मात्र भारतीय फलंदाजी अक्षरश: ढेपाळली. भारतीय संघ पाकिस्तानच्या कामगिरीच्या जवळपासदेखील जाऊ शकला नाही. मात्र तरीही भारतीय क्रिकेट चाहते भारताच्या बाजूने अगदी ठामपणे उभे आहेत. सोशल मीडियावर त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते आहे.