दक्षिण आफ्रिकेतील १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्याचं भारतीय संघाचं स्वप्न अखेरीस भंगलेलं आहे. अंतिम फेरीत बांगलादेशने भारतावर ३ गडी राखत मात करत पहिल्यांदाच १९ वर्षाखालील विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. भारताने विजयासाठी दिलेलं १७८ धावांचं आव्हान बांगलादेशने संयमी खेळी करत पूर्ण केलं. भारताकडून रवी बिश्नोई आणि सुशांत मिश्राने गोलंदाजीत प्रयत्नांची पराकाष्टा केली, मात्र इतर भारतीय गोलंदाजांच्या स्वैर माऱ्यामुळे भारताने मोक्याच्या क्षणी सामना गमावला.
परवेझ हुसैन इमॉन आणि तांझिद हसन या जोडीने बांगलादेशला चांगली सुरुवात करुन दिली. विजयासाठी छोटं लक्ष्य असल्यामुळे बांगलादेश हा सामना सहज जिंकणार असं वाटत असतानाच रवी बिश्नोईने तांझिदला माघारी धाडलं. यानंतर उपांत्य सामन्यात शतकवीर महमदुल हसनचाही रवीने त्रिफळा उडवला. यानंतर बांगलादेशच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. बिश्नोई आणि सुशांत मिश्राने बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडत भारताची बाजू वरचढ केली. त्यातच परवेझ इमॉनला धावताना त्रास जावणायला लागल्यामुळे त्याने मैदान सोडणं पसंत केलं.
परवेझ माघारी परतल्यानंतर कर्णधार अकबर अलीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र बांगलादेशला सहावा धक्का बसल्यानंतर परवेझ आपली दुखापत विसरुन मैदानात उतरला. परवेझ आणि अकबर अली जोडीने संयमी फलंदाजी करत बांगलादेशला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. प्रियम गर्गने ही जोडी फोडण्यासाठी अखेरीस यशस्वी जैस्वालला चेंडू दिला, यशस्वीनेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत इमॉनला माघारी धाडलं, त्याने ४७ धावांची खेळी केली. मध्यंतरी सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे खेळ काही मिनीटांसाठी थांबवण्यात आला. यादरम्यान डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशला विजयासाठी १७० धावांचं आव्हान देण्यात आलं. पावसाचा व्यत्यय थांबल्यानंतर कर्णधार अकबल अलीने रकीब उल-हसनच्या साथीने संयमीपणे खेळ करत बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
त्याआधी, विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणाऱ्या भारतीय संघाला बांगलादेशकडून चांगलीच कडवी झुंज मिळाली आहे. अविशेक दास, शोरिफुल इस्लाम यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताला १७७ धावांवर रोखण्यात बांगलादेशला यश आलं आहे. नाणेफेक जिंकत बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशी गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. भारताकडून यशस्वी जैस्वालने एकाकी झुंज देत ८८ धावांची खेळी केली. त्याला तिलक वर्माने ३८ धावा करत चांगली साथ दिली.
बांगलादेशी गोलंदाजांनी सामन्याची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. दिव्यांश सक्सेना आणि यशस्वी जैस्वाल जोडीला मोठे फटके खेळण्याची संधी न देता, त्यांच्यावर दडपड आणण्यात गोलंदाज यशस्वी ठरले. या दडपणामुळे सलामीवीर दिव्यांश सक्सेना झटपट माघारी परतला. यानंतर तिलक वर्मा आणि यशस्वी जैस्वालने दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी रचत भारतीय संघाचा डाव सावरला. यशस्वी जैस्वालने यादरम्यान आपलं अर्धशतकही साजरं केलं.
शाकीबने तिलक वर्माला माघारी धाडलं आणि भारतीय डावाला गळती लागली. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे भारताचा डाव सावरु शकला नाही. ध्रुव जुरेलने मधल्या फळीत यशस्वीला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र यशस्वी जैस्वाल माघारी परतल्यानंतर भारतीय संघाची अवस्था अधिकच खराब झाली. अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी करत अक्षरशः विकेट फेकल्या. भारताचे दोन फलंदाज धावबाद झाले. बांगलादेशकडून अविशेक दासने ३, हसन शाकीब आणि शोरिफुल इस्लामने प्रत्येकी २-२ तर रकीब उल-हसनने एक बळी घेतला.
Highlights
३ गडी राखत भारतावर केली मात, बांगलादेशचं १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतलं पहिलं विजेतेपद
बांगलादेशची विजयाच्या दिशेने वाटचाल
परवेझ इमॉन यशस्वी जैस्वालच्या गोलंदाजीवर माघारी परतला
बांगलादेशला सातवा धक्का, सामन्यातली रंगत कायम
अंतिम सामना रंगतदार अवस्थेत
अविशेक दास झेलबाद, बांगलादेशला सहावा धक्का
याच षटकात भारतीय क्षेत्ररक्षकांनी अविशेकला दोनवेळा जीवदान दिलं होतं
बांगलादेशने ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा
सुशांत मिश्राच्या गोलंदाजीवर शमीम हुसैन माघारी
यशस्वी जैस्वालने घेतला हुसैनचा सुरेख झेल, सुशांतने मिळवून दिला भारताला ब्रेक-थ्रू
रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक जुरेलने केलं यष्टीचीत
बांगलादेशच्या डावाला खिंडार, बिश्नोईच्या खात्यात आतापर्यंत ४ बळी
तौहीद हृदॉय पायचीत, बांगलादेशचा तिसरा गडी माघारी
पायात गोळे आल्यामुळे परवेझला खेळताना त्रास जाणवत होता, अखेरीस फिजीओच्या सल्ल्यानंतर इमॉनने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला
रवी बिश्नोईने उडवला मोहमदुल हसन जॉयचा त्रिफळा
तांझिद हसन रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर माघारी
पहिल्या विकेटसाठी बांगलादेशी सलामीवीरांची अर्धशतकी भागीदारी
सुशांत मिश्रा माघारी, बांगलादेशला विजयासाठी १७८ धावांचं आव्हान
अविशेक दासने घेतला बळी, भारताचा डाव कोलमडला
अविशेक दासने उडवला अंकोलेकरचा त्रिफळा, भारताच्या तळातल्या फलंदाजांची हाराकिरी
चोरटी धाव घेताना रवी बिश्नोई धावबाद, भारतीय फलंदाजांकडून निराशाजनक कामगिरी
एकेरी धाव घेताना दोन फलंदाजांमध्ये झालेल्या गैरसमजामुळे जुरेल धावबाद
लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर वीर पायचीत, भारताचा निम्मा संघ माघारी
शोरिफुल इस्लामच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना जैस्वाल झेलबाद
अंतिम फेरीत यशस्वी जैस्वालची ८८ धावांची खेळी, अर्धशतकी खेळीत ८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश
रकीब उल-हसनच्या गोलंदाजीवर शाकीबच्या हाती झेल देत प्रियम गर्ग बाद, केल्या अवघ्या ७ धावा
शाकीबच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात तिलम वर्मा झेलबाद
३८ धावांची खेळी करत तिलक वर्मा बाद
तिलक वर्माच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी रचताना डावरला संघ
भारताने ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा
दुसऱ्या विकेटसाठी वर्मा - जैस्वालची अर्धशतकी भागीदारी
अविशेक दासच्या गोलंदाजीवर मोहमदुल हसनने घेतला झेल
अवघ्या २ धावा काढत दिव्यांश माघारी
हवेत चेंडू स्विंग करत भारतीय फलंदाजांवर दडपण, बाऊन्सर चेंडू टाकत भारतीय फलंदाजांपुढे बांगलादेशचं मोठं आव्हान
भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत, बांगलादेशच्या अंतिम संघात हसन मुरादच्या जागी अविषेक दासला स्थान