दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत अकबर अलीच्या बांगलादेश संघाने अंतिम फेरीत भारतीय संघाचं आव्हान मोडीत काढत विजयाची नोंद केली. १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकण्याची बांगलादेश संघाची ही पहिलीच वेळ ठरली आहे. भारताने विजयासाठी दिलेलं आव्हान बांगलादेशने परवेझ हुसैन इमॉन आणि कर्णधार अकबर अलीच्या संयमी खेळाच्या जोरावर पूर्ण केलं.

बांगलादेशी फलंदाजांनी आपल्या डावाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली होती. मात्र रवी बिश्नोईने आपल्या फिरकीच्या जाळ्यात बांगलादेशी फलंदाजांना अडकवत भारताचं पारडं जड केलं. परवेझ इमॉनला फलंदाजीदरम्यान धावताना त्रास जाणवत होता, काहीकाळासाठी त्याने मैदान सोडणंही पसंत केलं होतं. मात्र संघाला गरज असताना त्याने पुन्हा मैदानात येत बांगलादेशच्या विजयात मोलाचा वाटा दिला.

मात्र यादरम्यान बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने संयमी खेळ करत संघाला पहिलं विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना इमॉन माघारी परतला होता. मात्र अकबर अलीने कोणतीही घाई न करता एकेरी-दुहेरी धाव घेण्यावर भर देत संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. रकीब उल-हसनच्या साथीने आठव्या विकेटसाठी अकबर अलीने संयमी भागीदारी केली. अकबर अलीने अखेरपर्यंत नाबाद राहत, ७७ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ४३ धावांची खेळी केली.  या खेळीसाठी अकबर अलीला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.  बांगलादेशचं १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतलं हे पहिलंच विजेतेपद ठरलं आहे.