पहिल्या अंतिम फेरीत बेंगळूरूवर १५ गुणांनी मात
अॅलेक्स स्केल्स आणि जिमी स्क्रोगिन्स यांच्या दमदार खेळाच्या जोरावर मुंबई चॅलेंजर्स संघाने यूबीए प्रो-बास्केटबॉल लीगमध्ये बेंगळूरु बीस्ट संघावर ११०-९५ असा विजय मिळवत विजेतेपदाचा पाया रचला. मंगळवारी रंगलेल्या चौथ्या हंगाामातील पहिल्या अंतिम फेरीत मुंबईने जोरदार आक्रमणाच्या जोरावर बेंगळूरुच्या संघाला हताश केले. तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांत बेंगळूरुने मुंबईवर जोरदार हल्ले लढवत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांच्या पदरी मात्र पराभवच पडला. तीन अंतिम सामन्यांपैकी बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या लढतीत बेंगळूरुने विजय मिळवल्यास त्यांचे या स्पर्धेतील आव्हान कायम राहील. या लढतीत मुंबईकडून अॅलेक्सने सर्वाधिक ३४, तर जिमीने ३२ गुणांची कमाई केली, तर बेंगळूरुकडून ख्रिस सोलोमनने २८ गुण मिळवले.
पहिल्या सत्रात मुंबईने अॅलेक्स (१५) आणि जिमी (१०) यांच्या आक्रमणाच्या जोरावर २९-१९ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला अॅलेक्स आणि जिमी यांनी जलद खेळ करत संघाची गुणसंख्या झपाटय़ाने वाढवली. त्यामुळे या सत्राच्या उत्तरार्धात त्यांना विश्रांती देण्यात आली; पण याचा फायदा बेंगळूरुला उचलता आला नाही. दुसऱ्या सत्रात मुंबईने २९ गुणांची भर घालत ५८-३६ अशी आघाडी घेतली.
तिसऱ्या सत्रात बेंगळूरुच्या विशेष भ्रिगुवंशीने जोरदार आक्रमण केले. त्याच्या आक्रमणाला संघ सहकाऱ्यांनी सुरेख साथ दिली. दुसरीकडे बेंगळूरुने या सत्रात चांगला बचावही केला. त्यामुळे तिसऱ्या सत्रात बेंगळूरुच्या संघाने २४ गुणांची कमाई केली, पण मुंबईने या सत्रात ३१ गुणांची कमाई करत ८९-६० अशा फरकाने आघाडी मात्र कायम ठेवली.
चौथ्या सत्राच्या पहिल्या दीड मिनिटांमध्ये जोरदार आक्रमण करत बेंगळूरुने आठ गुणांची कमाई केली. या सत्रात बेंगळूरुच्या आक्रमणाला चांगलीच धार आली होती. एका बाजूने विशेष आणि दुसऱ्या बाजूने ख्रिस यांनी मुंबईच्या संघावर जोरदार हल्ले चढवले. हे त्यांचे डावपेच लक्षात घेत मुंबईने विशेषचे आक्रमण बोथट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना यशही आले. चौथ्या सत्राला सहा मिनिटे शिल्लक असताना जिमीने मुंबईला दोन गुण मिळवून देत संघाचे शतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने बेंगळूरुही चांगले आक्रमण करत होती, पण शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्यांच्या हातून काही चुका घडल्या आणि त्याच त्यांना महागात पडल्या.