UEFA Champions League : या स्पर्धेत जुव्हेन्टस क्लबने व्हॅलेन्सिया क्लबवर १-० असा विजय मिळवला. या विजयाबरोबरच जुव्हेन्टसने स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला या सामन्यात एकही गोल आपल्या नावे करता आला नाही. पण तरीदेखील त्याने एक विक्रम केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुव्हेन्टस क्लबकडून मारियो मॅनझुकिचने गोल केला आणि त्या एका गोलच्या बळावर जुव्हेन्टस क्लबने सामना जिंकला. पण हा गोल करण्यात रोनाल्डोने महत्वाची भूमिका बजावली. त्याने आक्रमण फळीत स्वतःकडे फुटबॉल ठेवत शेवट्पर्यंत फुटबॉलवरील ताबा सोडला नाही. मोक्याच्या क्षणी त्याने फुटबॉल पास केला आणि मॅनझुकिचला गोल करण्याची सोपी संधी निर्माण करून दिली.

जुव्हेन्टस क्लबने सामना जिंकलाच, पण त्याबरोबर रोनाल्डोनेदेखील एक विश्वविक्रम केला. चॅम्पियन्स लीगच्या त्याने विजयाचे शतक साजरे केले. या स्पर्धेत १०० विजय पाहणारा तो पहिला खेळाडू ठरला.

रोनाल्डोसाठी हा स्पर्धेतील शंभरावा विजय ठरला. रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडचे प्रतिनिधित्व करत असताना क्लबने २६ सामने जिंकले, तर रियल माद्रिदकडून त्याने ७१ विजय मिळवले. जुव्हेन्टस क्लबकडून त्याचा हा तिसरा विजय ठरला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uefa champions league cristiano ronaldo become 1st player to register 100 ulc wins