रविवारी ऑस्ट्रेलियाच्या रूपात जगाला नवा टी-२० विश्वविजेता मिळाला. जोश हेझलवूडच्या (३/१६) अफलातून गोलंदाजीनंतर मिचेल मार्श (५० चेंडूंत नाबाद ७७ धावा) आणि डेव्हिड वॉर्नर (३८ चेंडूंत ५३) या जोडीने साकारलेल्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला आठ गडी आणि सात चेंडू राखून नामोहरम केले. वॉर्नर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. मात्र वॉर्नरला देण्यात आलेल्या या मालिकावीर पुरस्कारामुळे पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने उघडपणे नाराजी व्यक्त केलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेव्हिड वॉर्नरला मालिकावीराचाही किताब मिळाला. त्याने ७ डावात ४८ च्या सरासरीने २८९ धावा केल्या. तसेच ३ अर्धशतके ठोकली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४७ होता. वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ८९ धावांची त्याची सर्वात मोठी खेळी खेळली. टी-२० विश्वचषकाच्या शेवटच्या तीन डावात वॉर्नरने अनुक्रमे ८९*, ४९ आणि ५३ धावा केल्या. म्हणजेच संघाच्या गरजेच्या वेळी त्याने स्वतःला सिद्ध केले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या स्पर्धेत सर्वाधिक ३०३ धावा केल्या. वॉर्नर दुसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळेच मालिकावीर पुरस्कार बाबारला द्यायला हवा होता असं शोएबने म्हटलं आहे. वॉर्नरला मालिकावीर पुरस्कार देणं चुकीचा निर्णय असल्याचं शोएब म्हणालाय.

“मी प्रतिक्षा करत होतो की बाबर आझमला मालिकावीर पुरस्कार दिला जाईल. हा नक्कीच अन्यायकारक निर्णय आहे,” असं ट्विट शोएब अख्तरने केलं आहे. केवळ अख्तरच नाही तर पाकिस्तानच्या अनेक चाहत्यांनी वॉर्नरपेक्षा अधिक धावा करणाऱ्या बाबरला हा पुरस्कार देणं योग्य ठरलं असतं अशी मतं सोशल मिडियावर व्यक्त केल्याचं पहायला मिळत आहे.

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने वॉर्नरला अचानक आयपीएल २०२१ मधून डच्चू दिलेला. सनरायझर्स हैदराबादने वॉर्नरकडून कप्तानपद काढून घेतलं होतं. हैदराबादच्या संघाने केन विल्यमसनला संघाचा कर्णधार बनवलं होतं. एवढेच नव्हे, तर आयपीएलच्या अंतिम सामन्यांमध्ये वॉर्नरला प्लेइंग-११ मधूनही वगळण्यात आले होते. पण वॉर्नरने टी-२० विश्वचषकातील आपल्या कामगिरीने सर्व विरोधकांना उत्तर दिले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unfair decision akhtar unimpressed as warner named player of the tournament wanted honour to go to pakistan batter scsg